Shoaib Akhtar angry on India T20 World Cup Win: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२६ अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाविरूद्ध ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताच्या या दणदणीत विजयानंतर जगभरातील क्रिकेटविश्वात प्रतिक्रिया उमटत आहेत. पाकिस्तानचे खेळाडू मात्र भारताच्या या विजयानंतर संतापलेले दिसत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सर्वात वादग्रस्त प्रतिक्रिया देत भारताच्या या वर्चस्व गाजवत मिळवलेल्या विजयामुळे क्रिकेट बिघडवून टाकल्याचा दावा केला.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाचे विक्रमी तिसरे विजेतेपद पटकावले. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी भारताच्या दमदार आणि शिस्तबद्ध कामगिरीचं कौतुक केले. मात्र ‘गेम ऑन है’ या शोमध्ये बोलताना अख्तरने भारतावर टीका करत त्यांची तुलना परिसरातील खेळात वर्चस्व गाजवणाऱ्या “एखाद्या श्रीमंत मुलाशी” केली.

भारताचा टी-२० वर्ल्डकप विजय पाहून शोएब अख्तरचं रक्त खवळलं

“जणू एखाद्या परिसरात एक श्रीमंत मुलगा असतो आणि तो गरीब मुलांना बोलावतो व म्हणतो, ‘या, क्रिकेट खेळूया.’ भारत सध्या आपल्यासोबत अगदी तेच करत आहे. आठ संघांमधून ते चार संघ ठेवतात आणि त्या चौघांमधून पुन्हा तीन संघांना बोलावतात, पुढे जातात आणि मग म्हणतात, ‘पाहा, आम्ही जिंकलो.’ त्यांनी क्रिकेटचं वाटोळ करून टाकलं आहे,” असं शोएब अख्तर म्हणाला.

हेही वाचा

पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. भारताच्या दणदणीत विजयामुळे आलेली ही कटू प्रतिक्रिया असल्याची टीका अनेक चाहत्यांनी केली. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यापूर्वी अख्तरचा सूर थोडा वेगळा होता. भारताला प्रबळ दावेदार मान्य करतानाच त्याने क्रिकेटच्या भल्यासाठी न्यूझीलंड संघाने विश्वचषक जिंकावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

“मला वाटतं, भारतासमोर न्यूझीलंड थोडे दबावाखाली येऊ शकतात. पण भारतावरही १.५ बिलियन लोकांच्या अपेक्षांचे प्रचंड दडपण आहे. अहमदाबादमध्ये त्यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक अंतिम सामना गमावला आहे. तरीही मला या सगळ्यात भारतच विजेता वाटतो, पण क्रिकेटच्या दृष्टीने आता न्यूझीलंडने हा विश्वचषक जिंकण्याची वेळ आली आहे,” असे फायनलपूर्वी शोएब अख्तर म्हणाला होता.

टीका करत असतानाही शोएब अख्तरने भारताच्या यशामागील एक महत्त्वाचा घटक मान्य केला. माजी वेगवान गोलंदाजाने भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे कौतुक करत सांगितलं की, कठीण काळातही खेळाडूंवर विश्वास ठेवणं हीच मोठ्या स्पर्धांमध्ये फरक निर्माण करणारी बाब ठरते.

भारताच्या विजयानंतर वादग्रस्त प्रतिक्रिया देणारा शोएब अख्तर एकटाच नव्हता. पाकिस्तानचा आणखी एक माजी क्रिकेटपटू मोहम्मद आमिर यानेही आश्चर्यकारक मत व्यक्त केलं. हारना मना है या पाकिस्तानातील क्रिकेट टॉक शोमध्ये बोलताना आमिरने भारताच्या विजयाचे मोठे श्रेय न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांना दिले. त्याच्या मते, किवी गोलंदाजांना पुरेसा दबाव निर्माण करता आला नाही आणि त्यामुळे भारताच्या फलंदाजांना सामन्याचा वेग आपल्या नियंत्रणात ठेवता आला. मोहम्मद आमिरने तर सुपर-८ पासून भारतीय संघाच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती, पण टीम इंडियाच्या खेळाडूंनी सातत्याने ती खोटी ठरवली.