टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत चाहत्यांना थरारक सेमीफायनल सामना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने दमदार फॉर्मात असलेल्या पाकिस्तानला ५ गड्यांनी नमवत फायनलमध्ये प्रवेश केला. संपूर्ण सामना पाकिस्तानच्या हातात असताना मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी अक्षरश: विजय खेचून आणला. या निराशाजनक पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्पर्धेच्या प्रारंभापासून पाकिस्तान संघ हा फायनलमध्ये जाणार, असे भाकीत शोएब व्यक्त करत होता. पण संघाचा प्रवास उपांत्य फेरीतच थांबला. स्पर्धेबाहेर झाल्यानंतर शोएबला काय बोलावे ते कळत नव्हते. तो म्हणाला, ”पाकिस्तानने २० धावा जास्त केल्या पाहिजे होत्या. ते मध्ये संथ खेळले. सर्वांचे ह्रदय तुटले आहे. मी निराश झालोय. हा वर्ल्डकप आमचा होता. यातून आपले शिकले पाहिजे.”

हेही वाचा – BLUNDER..! टी-२० क्रिकेटमध्ये गावसकर आणि हजारेंचा समावेश; पाकिस्तान क्रिकेटनं ट्विटरवर खाल्ली माती!

दुसऱ्या व्हिडिओत अख्तर म्हणाला, ”हे खरच दुर्दैवी आहे. आपण हरलेलो नाही. तुम्ही सर्वांनी पाकिस्तान संघाची साथ सोडू नका. तुम्ही खूप चांगले खेळले. ऑस्ट्रेलियाने चांगले क्रिकेट खेळले, हे आपण मान्य केले पाहिजे. सोशल मीडियावर आपण पाकिस्तानची साथ दिली पाहिजे. पराभव खरच निराशाजनक होता. सर्वांचे ह्रदय तुटले आहे.”

असा रंगला सामना…

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला तंगवले. रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात गमावले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shoaib akhtar reacts as pakistan lost semi final against australia in t20 world cup 2021 adn
First published on: 12-11-2021 at 10:28 IST