Shoaib Akhtar criticised PCB Chief Mohsin Naqvi: भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर चांगलाच संतापला आहे. भारताने टी-२० विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव करत सुपर-८ मध्ये धडक मारली आहे. पाकिस्तानच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर जोरदार शब्दांत टीका केली. शोएब अख्तरने या सामन्यानंतर अप्रत्यक्षपणे पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वींना सुनावलं आहे.
भारताने केलेला संघाचा लाजिरवाणा पराभव पाहून शोएब अख्तर निराश झाला होता. त्याने यादरम्यान बोलताना राष्ट्रीय संघाच्या कारभाराबाबत PCB ची भूमिका आणि निर्णयप्रक्रिया यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेषतः महत्त्वाच्या सामन्यांत वारंवार अपयशी ठरणाऱ्या वरिष्ठ खेळाडूंना सातत्याने पाठिंबा देण्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली.
शोएब अख्तर पाकिस्तानच्या पराभवानंतर संतापला
भारताविरुद्धच्या सामन्यात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान यांसारख्या अनुभवी खेळाडूंची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. त्यामुळे वारंवार अपयश येऊनही त्यांना बिनधास्त पाठिंबा का दिला जातो, असा थेट सवाल अख्तरने उपस्थित केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या नेतृत्वक्षमतेवरही त्याने शंका व्यक्त केली. अख्तर म्हणाला, “आता एखाद्याला स्वतःलाच माहित नाही की तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष आहे. मग संघ कसा चालणार? तुम्ही एखाद्याला सुपरस्टार बनवलं, पण तो एकही सामना जिंकू शकत नाही. अशा खेळाडूंना तुम्ही स्टार बनवता आणि मग संघाकडून वेगळ्या अपेक्षा ठेवता.”
“जेव्हा तुम्ही असे कोणतेही स्टार खेळाडू तयार करता, त्यांची निवड करता, त्यांना पुढे घेऊन जाता, तेव्हा अशाच समस्या निर्माण होतात आणि जगातील सर्वात मोठा गुन्हा कोणता माहिती आहे? एखाद्या अयोग्य व्यक्तीला मोठी जबाबदारी देणं, हा सर्वात मोठा गुन्हा आहे.” अख्तरच्या या वक्तव्यांनंतर पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
पुढे शोएब अख्तर म्हणाला, “जेव्हा तुम्ही एखाद्या अकार्यक्षम आणि अननुभवी व्यक्तीला मोठी जबाबदारी देता, तेव्हा तो देशालाही नुकसान पोहोचवू शकतो. कोणतीही संस्था कोसळू शकते. उदाहरण तुमच्यासमोर आहे; तुम्ही याचा अर्थ समजण्याइतके हुशार आहेत.” दरम्यान, भारताविरुद्ध पाकिस्तानची सातत्याने होत असलेली निराशाजनक कामगिरी आता मोठ्या चिंतेचा विषय बनली आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील पराभवानंतर चाहते आणि तज्ज्ञ दोघेही बोर्ड तसेच दबावाच्या सामन्यांत वारंवार अपयशी ठरणाऱ्या खेळाडूंना जबाबदार धरण्याची मागणी करत आहेत.
शोएब अख्तरसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी पीसीबीच्या अध्यक्षांवर केलेली ही टीका लक्षवेधी ठरली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डात गेल्या वर्षभरात प्रत्यक्ष प्रगतीपेक्षा केवळ दिखावा व प्रतिमा जपण्याला अधिक महत्त्व दिलं गोलं. टी-२० विश्वचषकातील भारताविरूद्ध सामन्यावर बहिष्काराच्या इशाऱ्यावरून पाकिस्तानने अखेर यू-टर्न घेतल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली, भारतीय संघ बांधणी आणि तयारीत व्यस्त असताना, पाकिस्तानचे नेतृत्व कथानक उभं करण्यात आणि बोर्डरूममधील संघर्षाच्या केंद्रस्थानी राहण्यात अधिक गुंतलेलं दिसलं.
