Shoaib Malik Vanija Sattar Fourth Marriage Rumors: शोएब मलिक त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपेक्षा त्याच्या वैयक्तिक आणि प्रेमसंबंधांमुळेच अधिक चर्चेत राहिला आहे. अलीकडेच, त्याच्या आयुष्याबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशा काही अफवा पसरल्या ज्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. शोएब मलिक मॉडेल आणि अभिनेत्री वनिझा सत्तार हिच्याशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या आहेत. या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, चाहत्यांनी याबाबत तर्क वितर्क लावण्यास सुरूवात केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की, शोएब मलिक आणि वनिजा सत्तार २ ऑक्टोबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. सोशल मीडियावर यासंबंधित पोस्टदेखील व्हायरल होत आहेत. पण यासंबंधिक शोएब मलिकने कोणतंही अधिकृत वक्तव्य दिलेलं नाही.

शोएब मलिकच्या लग्नाबाबत अशा प्रकारच्या अफवा पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात, सोशल मीडियावर अचानक अनेक पोस्ट्सचा भडिमार झाला होता; त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की, शोएब मलिक आणि वनिजा सत्तार यांनी २७ फेब्रुवारी रोजी गुपचूप लग्न केलं आहे.

कोण आहे वनिजा सत्तार?

इतकंच नाही, तर काही सोशल मीडिया युझर्सने असा दावाही केला की, या दोघांच्या लग्नाचे खास फोटो समोर आले आहेत. वनिजा सत्तार ही कराचीमधील एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री असून, ती तिच्या सौंदर्यासाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. जेव्हा एका लोकप्रिय क्रिकेटपटूचे नाव एका प्रसिद्ध आणि ग्लॅमरस अभिनेत्रीशी जोडलं गेलं, तेव्हापासूनच या अफवांना उधाण आलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात चौथ्या लग्नाबाबतच्या अफवा जेव्हा जोर धरत होत्या, तेव्हा शोएब मलिक गप्प बसला नाही. त्याने हे दावे खोटे असल्याचं म्हटलं. २८ फेब्रुवारी २०२६ला शोएब मलिकने एक सविस्तर आणि कठोर अधिकृत निवेदन जारी केलं. त्यात त्याने स्पष्टपणे नमूद केलं की, सोशल मीडियावर फिरणारे सर्व रिपोर्ट्स पूर्णपणे “खोटे आणि बनावट” होते. शोएबने असा इशाराही दिला की, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सोडलं जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याने स्पष्टपणे सांगितलं की, त्याने वनिजा सत्तार यांना प्रत्यक्ष आयुष्यात कधीही पाहिलेलं नाही, तसेच त्यांच्याशी कधीही कोणताही संवाद किंवा संपर्क साधलेला नाही.

केवळ शोएब मलिकच नाही, तर पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री वनीझा सत्तार हिनेही एका टीव्ही शोदरम्यान या संपूर्ण प्रकरणावर मोकळेपणाने भाष्य केलं. यासंदर्भातील तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने तिने प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली. आपण शोएब मलिकला कधीही प्रत्यक्ष भेटलो नाही, असं वनीझाने स्पष्टपणे सांगितलं. आश्चर्य व्यक्त करत ती म्हणाली की, अशा निराधार आणि बनावट गोष्टी कुठे किंवा का रचल्या जात आहेत, हे तिला समजूच शकलं नाही. तिने या सर्व अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या होत्या.