Basit Ali On Pakistan Cricket Team: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत पाकिस्तानचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. पाकिस्तानला या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी होती. पण श्रीलंकेविरूद्ध झालेल्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा संघ सुपर ८ फेरीतून बाहेर पडला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव झाला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव ३१ व्या षटकात अवघ्या ११४ धावांवर आटोपला.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ११५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने १५.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं आणि ८ गडी राखून विजयाची नोंद केली. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघातील खेळाडूंवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने संताप व्यक्त केला असून, पाकिस्तान क्रिकेट बोर्डावरही जोरदार टीका केली आहे.

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या कामगिरीनंतर बासित अलीने टीम मॅनेंजमेंटवर टीका केली आहे. बासित म्हणाला, “सर्वात आधी तर त्या माणसाला गोळी मारली पाहिजे ज्याने असं सांगितलं की, पहिल्या १० षटकात कमीत कमी ६० धावा व्हायला हव्या. ते स्वत: कधी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरलेले नाहीत. फक्त एका कागदावर प्लॅन बनवून खेळाडूंच्या हातात देऊन टाकतात.”बांगलादेशमधील परिस्थिती काय आहे, टीम मॅनेजमेंटला दिसत नाही का? भारताचा संघही इथे हरलेला आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “युवा खेळाडूंना आणखी वेळ द्या, असं तुम्ही बोलूच नका. जगभरातील इतर युवा खेळाडू जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी येतात, ते तयार होऊन आलेले असतात आणि येताच आपली छाप सोडतात. आपल्या खेळाडूंनी हे समजून घ्यायला हवं की हे लोकल क्लबचं मैदान नाही, तर आंतरराष्ट्रीय मैदान आहे.” या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. संघातील अनुभवी फलंदाज सलमान अली आघा आणि मोहम्मद रिझवान हे पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात पाकिस्तानच्या ४ खेळाडूंनी पदार्पण केलं. फहीम अशरफची ३७ धावांची खेळी वगळता, इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. या खेळीच्या बळावर पाकिस्तानने ११४ धावांपर्यंत मजल मारली होती.