‘नेमबाजीत कर्तृत्व सिद्ध केल्यामुळेच मला उपजिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. नेमबाजी करताना मी सदैव सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करते. प्रशासकीय जबाबदारी माझ्यासाठी नवीन आहे. हे काम शिकण्यासाठी माझे प्रशिक्षण सुरू आहे. नेमबाजीच्या स्पर्धा आणि सरावाचा वेळ सोडून अन्य वेळ मी यासाठी देते. नेमबाजीप्रमाणेच नव्या कामालाही न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे’. पुण्याची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या राष्ट्रकुल सुवर्णपदकविजेती नेमबाज राही सरनोबतने नवी जबाबदारी, दुखापती, आव्हाने याविषयी केलेली बातचीत.
सरकारी नोकरीच्या नव्या जबाबदारीविषयी काय सांगशील ?
नेमबाजीमधल्या माझ्या योगदानाची दखल घेऊन माझी नियुक्ती करण्यात आली याचे समाधान आहे. ज्या राज्यात मी राहते, त्या सरकारतर्फे असे प्रोत्साहन हुरूप वाढवणारे असते. उपजिल्हाधिकारी पद ही खूप मोठी जबाबदारी आहे. हे काम शिकण्यासाठी सध्या माझे प्रशिक्षण सुरू आहे. तलाठी कार्यालय, न्यायालय, पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन मी अनेक गोष्टी शिकते आहे. उपजिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीभोवती सामान्य माणसांच्या समस्या, प्रश्न निगडित असतात. नेमबाज म्हणून मी देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. नव्या भूमिकेत त्यांच्या अडीअडचणी काही प्रमाणात दूर करू शकले तर ते समाधान देणारे असेल. नव्या जबाबदारीला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न असेल. सातबाराचे उतारे, प्रमाणपत्र या सर्वच संकल्पना समजून घेणे उत्साहवर्धक आहे. जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेमुळे मी महिनाभर दूर असेन. परंतु काही काम घरी शिकण्यासारखे आहे. पहिल्याच दिवशी सर्व सहकाऱ्यांनी मला नेमबाजीवर लक्ष केंद्रित करायला सांगितले आहे. त्यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम ठरवण्यात आला आहे, मात्र तो ठरावीक दिवसांतच समजून घेण्याची सक्ती नाही.
काही वादग्रस्त प्रकरणांमुळे क्रीडापटूंना फक्त क्रीडाक्षेत्राशी संबंधितच काम द्यावे अशी मागणी जोर धरते आहे. तुझे मत काय आहे?
हा वैयक्तिक मुद्दा आहे. परंतु क्रीडापटूंना नोकरी देताना अशा विशिष्ट क्षेत्राचे बंधन नको. नव्या गोष्टी शिकण्याचे कुतूहल मला आहे. साचेबद्ध कामापेक्षा नवीन गोष्टी समजून घेण्यात वेगळा आनंद आहे. परंतु प्रत्येकाला हे पचनी पडेल असे नाही. एखाद्या घटनेमुळे असा निर्णय घेण्यात येऊ नये. अनेक क्रीडापटू प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.
राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी तुझ्या हाताला गंभीर दुखापत झाली होती, त्याही परिस्थितीत तू पदक पटकावलेस, हे पुनरागमन कसे शक्य झाले?
उजवा हात नेमबाजीसाठी अविभाज्य आहे. ५ मे रोजी पुण्यातच मी उंचावरून पडले. डॉक्टरांकडून उपचार घेतले. मात्र तब्बल महिनाभरानंतर ४ जूनला उजव्या कोपराला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. माझ्यासाठी ते धक्कादायक होते. प्लास्टरमुळे खूप दिवसांकरता हाताच्या हालचालीवर बंधने येतात. तसे होऊ नये म्हणून मी प्लास्टर घातले नाही. मात्र हाताची अवस्था नाजूक होती. साधा चमचा उचलतानाही वेदना होत होत्या. स्पर्धा, पदक, सराव या सगळ्या विश्वापासून मी होतो. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खेळण्यासारखी परिस्थिती नव्हती. परंतु आजारी वातावरणातून बाहेर पडण्यासाठी मी जर्मनीला सरावासाठी जाण्याचा निर्णय घेतला. हाताची स्थिती काळजी करण्यासारखी होती. परंतु तरीही राष्ट्रकुल स्पर्धेत खेळण्याचा मी निर्णय घेतला. किमान मूलभूत कामगिरी करण्याचा माझा निश्चय होता. शारीरिकदृष्टय़ा माझी स्थिती बिकट होती. पात्रता फेरीत माझी कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. मात्र केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मी अंतिम फेरी खेळले आणि पदक पटकावले. ज्या परिस्थितीत मी हे पदक मिळवले ते लक्षात घेता कारकिर्दीतील सगळ्यात समाधानकारक क्षण होता.
या गंभीर दुखापतीतून बाहेर येण्यासाठी काय केलंस?
हा काळ खूपच कठीण होता. परंतु आजारी म्हणून मला कोणाचीही सहानुभूती नको होती. दुखापतीतून सावरण्यासाठी इंटरनेटवर या विषयासंदर्भात प्रचंड माहिती मिळवली. या माहितीचा उपयोगही केला. या काळात मोठय़ा प्रमाणावर पुस्तके वाचली. अवांतर वाचनामुळे गोळ्या-औषधे, आजार या वातावरणातून बाहेर पडले, आत्मविश्वास मिळाला.
आशियाई क्रीडा स्पर्धा काही दिवसांवर आली आहे, त्याआधी नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आहे, तयारीविषयी काय सांगशील?
हाताची दुखापत पूर्ण बरी झालेली नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत मला शिकवण्यात आलेल्या मानसिक कणखरता प्रशिक्षणाच्या जोरावर मी पदक जिंकले. परंतु शारीरिकदृष्टय़ा मी अजूनही तंदुरुस्त नाही. आशियाई स्पर्धेत या दोन्हींचा मेळ साधायचा आहे. परंतु हे करताना मला हाताला जपावे लागणार आहे. पदक पटकावणार अशा बढाया मारणे योग्य ठरणार नाही. स्पेनमध्ये होणारी अजिंक्यपद स्पर्धा नेमबाजीतल्या अग्रगण्य स्पर्धापैकी एक आहे. या तसेच आशियाई स्पर्धेत स्पर्धा खूप चुरशीची आहे. सर्वोत्तम कामगिरी निश्चितच करेन.