ऑलिम्पिक यशासाठी मर्यादित स्पर्धात सहभाग गरजेचा!

भारतीय नेमबाजांनी वर्षभरात मर्यादित स्पर्धात सहभाग घेत सरावावर अधिक लक्ष दिले पाहिजे, असे त्यांना वाटते.

आठवडय़ाची मुलाखत  : रौनक पंडित, (नेमबाजी प्रशिक्षक)

अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे भारतीय नेमबाजांकडून ऑलिम्पिक पदकाची आशा बाळगणे चुकीचे ठरेल, असे मत राष्ट्रकुल पदकविजेते भारताचे माजी नेमबाज आणि प्रशिक्षक रौनक पंडित यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय नेमबाजांनी वर्षभरात मर्यादित स्पर्धात सहभाग घेत सरावावर अधिक लक्ष दिले पाहिजे, असे त्यांना वाटते.

नुकत्याच पेरू येथे झालेल्या कनिष्ठ जागतिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक ४० पदकांची लयलूट केली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पंडित यांच्या मार्गदर्शनात खेळलेल्या मनू भाकरने या स्पर्धेत चार सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले. मात्र, मनूने या स्पर्धेत खेळण्यापेक्षा खेळातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे होते, असे तिचे ‘माजी’ प्रशिक्षक पंडित स्पष्टपणे म्हणाले. त्या पाश्र्वभूमीवर पंडित यांच्याशी केलेली ही खास बातचीत.

’ भारताचे नेमबाज कनिष्ठ जागतिक आणि विश्वचषक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करतात. मात्र, ऑलिम्पिकमध्ये त्यांना अपेक्षित यश मिळत नाही. त्याबाबत काय सांगाल?

कनिष्ठ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या अपेक्षा बाळगणे योग्य ठरणार नाही. भारताचे नेमबाज वर्षभरात सात-आठ स्पर्धामध्ये भाग घेतात आणि त्यांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. याउलट इतर देशांचे ऑलिम्पिक किंवा वरिष्ठ जागतिक स्पर्धातील पदकविजेते नेमबाज वर्षभरात दोन-तीन स्पर्धामध्येच खेळतात. तुमच्या खेळात काय सुधारणा आवश्यक आहे, तुम्ही काय चुका करत आहात, हे समजण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी तुमच्या हातात वेळ असणे गरजेचे आहे.

’ मनू भाकरने या स्पर्धेत पाच पदकांची कमाई केली. तिचे हे यश कितपत समाधानकारक होते?

भारताच्या कनिष्ठ नेमबाजांमध्ये मनू अव्वल क्रमांकावर असल्याने तिला या स्पर्धेत खेळण्याचा हक्क आहे. मात्र, या स्पर्धेतील तिच्या गुणांवर नजर टाकल्यास, त्या गुणांनी तिला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतही प्रवेश मिळवता येणार नाही. तिचे २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य असले पाहिजे आणि त्यादृष्टीने तिने तयारी करणे आवश्यक आहे. सातत्याने विविध स्पर्धामध्ये खेळत राहिल्यास तिला खेळातील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ मिळू शकणार नाही. त्यामुळे मर्यादित स्पर्धामध्ये भाग घेऊन सरावावर अधिक लक्ष द्या, असा माझा मनूसह भारताच्या सर्वच नेमबाजांना सल्ला आहे.

’ सध्या राष्ट्रीय प्रशिक्षक विरुद्ध वैयक्तिक प्रशिक्षक या विषयावर बरीच चर्चा सुरू आहे. तुम्ही या दोन्ही भूमिका बजावल्या आहेत. तुमचे याबाबत काय मत आहे?

नेमबाज आणि राष्ट्रीय प्रशिक्षक वेगवेगळ्या राज्यांत राहत असल्यास दररोज एकमेकांसोबत सराव करणे शक्य होत नाही. त्यामुळे नेमबाजांना वैयक्तिक प्रशिक्षकांची मदत घ्यावी लागते. परंतु राष्ट्रीय प्रशिक्षक आणि वैयक्तिक प्रशिक्षक यांच्यात उत्तम ताळमेळ असणे महत्त्वाचे आहे. अन्यथा वैयक्तिक प्रशिक्षकांनी नेमबाजाला सांगितलेली एखादी गोष्ट तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसल्यास त्यात बदल करण्यातच राष्ट्रीय प्रशिक्षकांचा बहुतांश वेळ जातो. याने नेमबाजाचे नुकसान होते.

’ टोक्यो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर भारताचे परदेशी नेमबाजी प्रशिक्षक कमी पडत असल्याचे तुम्ही म्हणाला होतात. प्रशिक्षकांच्या निवडप्रक्रियेत सुधारणेची आवश्यकता वाटते का?

सर्वच खेळाडूंमध्ये समान गुणवत्ता आणि प्रतिभा नसते, परंतु परदेशात प्रत्येक खेळाडू दर्जेदार असतो असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे परदेशातील एखाद्या माजी खेळाडूची अगदी सहज आपण प्रशिक्षकपदी नेमणूक करतो. मग त्यांना आपल्या नेमबाजांना समजून घेता येत नाही. तुम्ही प्रशिक्षक निवडताना त्याचा इतिहास, त्याने स्वत: नेमबाज म्हणून केलेली कामगिरी, त्याच्याकडे प्रशिक्षक म्हणून असलेला अनुभव यांसारख्या गोष्टी तपासून बघितल्या पाहिजेत. आपल्याकडे अनेक चांगले भारतीय प्रशिक्षक असून त्यांच्यावर विश्वास दाखवणे तसेच त्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेशी संधी देणे गरजेचे आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shooting coach ronak pandit interview for loksatta zws

ताज्या बातम्या