Mukul Choudhary Six: आयपीएल स्पर्धेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात जेव्हा सर्वकाही संपलं आहे असं वाटलं होतं, तेव्हा मुकुल चौधरी नावाचं वादळ कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर घोंगावल. २१ वर्षीय मुकुल चौधरीने कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने नाबाद ५४ धावांची खेळी करुन लखनौला ३ गडी राखून दमदार विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने शेवटच्या षटकात मारलेल्या शॉटची जोरदार चर्चा रंगली आहे.

मुकुल चौधरी १३ व्या षटकात फलंदाजी करण्यासाठी आला. सुरूवातीच्या ८ चेंडूंमध्ये त्याला अवघ्या २ धावा करता आल्या होत्या. शेवटी लखनौ सुपर जायंट्स संघाला ४ षटकात ५२ धावांची गरज होती. संघातील ७ प्रमुख फलंदाज माघारी परतले होते. त्यामुळे सामना जवळजवळ संपल्यात जमा होता. पण त्यानंतर त्याने बॅट फिरवायला सुरुवात केली आणि मग शेवटपर्यंत थांबला नाही.

मुकुल चौधरीला आपल्या फलंदाजीवर क्षमतेवर विश्वास होता. त्यामुळे त्याने एकेरी दुहेरी धाव घेण्यावर भर दिला नाही. एकतर चेंडू निर्धाव खेळून काढायचा किंवा मग टोलवून सीमारेषेपार पोहोचवायचा. त्याने या खेळीदरम्यान ७ गगनचुंबी षटकार खेचले. १७ व्या षटकात त्याने वैभव अरोराच्या गोलंदाजीवर त्याने धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट मारला. पण शेवटच्या षटकात ऑफ साईडच्या दिशेने मारलेल्या शॉटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

तर झाले असे की, लखनौ सुपर जायंट्स संघाला शेवटच्या २ चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी ७ धावा करायच्या होत्या. गोलंदाजी करत असलेला वैभव अरोरा दबावात होता. कारण शरीराच्या जवळपास टाकलेल्या चेंडूवर मुकुल मोठा प्रहार करत होता. त्यामुळे त्याने वाईड लाईनवर करत होता. मुकुल चौधरीलाही याबाबत कल्पना होती. तो खाली बसला आणि स्वीपर कव्हरच्या वरुन लॉफ्टेड हेलिकॉप्टर शॉट मारला. हा शॉट वेगाने सीमारेषेच्या बाहेर गेला. जागेवरून ऑफ साईडच्या दिशेन ८० मीटर लांब षटकार मारणं मुळीच सोपं नसतं. पण मुकुलचा टायमिंग आणि फटका अचूक असल्याने लखनौला ६ धावा मिळाल्या. लखनौला शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती. शेवटचा चेंडू निर्धाव राहिला. पण मुकुल चौधरीने एक धाव पूर्ण केली आणि लखनौला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.