खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा अव्वल दर्जाचा खेळाडू जीव मिल्खा सिंग दक्षिण आफ्रिकेतील श्वेन खुल्या गोल्फ स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे.
जीवने सांगितले, ‘‘उजव्या खांद्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करावी लागणार नसली तरी वैद्यकीयतज्ज्ञांनी थोडे दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आफ्रिकेतील स्पर्धेत भाग न घेता दोन आठवडे विश्रांती व थोडासा सराव यावर मी भर देणार आहे. त्यानंतर मोरोक्कोमध्ये होणाऱ्या स्पर्धेत मी सहभागी होईन. पुन्हा एक महिना स्पर्धात्मक गोल्फपासून मी दूर राहणार आहे.’’
श्वेन खुली स्पर्धा २७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा दोन मार्चपर्यंत चालणार आहे. त्यानंतर लगेच मोरोक्कोत स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जीव भाग घेण्याची शक्यता आहे. या स्पर्धेनंतर तो १७ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मलेशियन स्पर्धेत सहभागी होईल. या स्पर्धेपाठोपाठ व्हाल्व्हो चीन, कोरियन व स्पॅनिश स्पर्धामध्ये त्याचा सहभाग राहणार आहे. या स्पर्धानंतर युरोपातील विविध स्पर्धामध्ये तो सहभागी होणार आहे.
‘‘युरोपियन खुल्या व अमेरिकन खुल्या स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे. त्यादृष्टीने मी स्पर्धा व सराव याचे योग्य रीतीने नियोजन करीत आहे,’’ असेही जीवने सांगितले. गतवर्षी त्याला खांद्याच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धावर पाणी सोडावे लागले होते.