ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेनचे अभिनंदन केले. लव्हलिनाचे यश अनेक भारतीयांना प्रेरणा देईल, असे मोदी म्हणाले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

दरम्यान, लव्हलिनावर संपुर्ण देशात कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लव्हलिनाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “लव्हलिना बोर्गोहेन खूप चांगली लढलीस. बॉक्सिंग रिंगमधील तुमचं यश अनेक भारतीयांना प्रेरणा देते. तुमचा दृढनिश्चय आणि संकल्प प्रशंसनीय आहे. कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन. भविष्यासाठी अनेक शुभेच्छा.”

वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; भारतासाठी मेडल निश्चित करणाऱ्या लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पीव्ही सिंधूने बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. लव्हलिनाचे पदक हे गेल्या नऊ वर्षांतील ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताचे पहिले पदक आहे. यापूर्वी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर मेरी कोमने कांस्यपदक पटकावले होते. त्याचबरोबर पुरुषांच्या बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.