Shree Charani ICC Womens T20I Ranking: आयसीसीकडून महिलांची टी-२० रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या रँकिंगमध्ये भारताची २२ वर्षांची स्टार फिरकीपटू श्री चरणीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या रँकिंगमध्येही श्री चरणी अव्वल स्थानी कायम असून तिने महिलांच्या टी-२० आंतररराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम रेटिंग मिळवण्याचा मान पटकावला आहे. तिने आतापर्यंतचे सर्वोत्तम ८१७ रेटिंग पॉईंट्स मिळवले आहेत. यासह ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूटचा रेकॉर्ड मोडून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
श्री चरणीला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, तिने संधीचं सोनं केलं आहे.भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धा जिंकून देण्यातही तिने मोलाची भूमिका बजावली होती. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कमी सामन्यांमध्ये तिने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता तिने असा काही रेकॉर्ड केला आहे, जो याआधी कुठल्याही गोलंदाजाला करता आला नव्हता. श्री चरणीने मेगन शूटचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये मेगन शूटने सर्वाधिक ८०६ रेटिंग पॉईंट्सपर्यंत मजल मारली होती. आता मेगन शूटहून ११ अधिक रेटिंग पॉईंट्सची कमाई करून श्री चरणी ही महिलांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८१७ रेटिंग पॉईंट्स मिळवणारी जगातील पहिलीच गोलंदाज ठरली आहे.
आशिया चषक स्पर्धेसाठीही तिला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. या स्पर्धेतही तिच्या गोलंदाजीचाा बोलबाला पाहायला मिळाला. या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ती दुसऱ्या स्थानी राहिली. या स्पर्धेत गोलंदाजी करताना तिने १२ गडी बाद केले.यादरम्यान श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात तिने अवघ्या २० धावा खर्च करून ४ गडी बाद केले. या गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने श्रीलंकेवर ७२ धावांनी विजय मिळवला आणि जेतेपदावर नाव कोरलं.
आशिया चषक स्पर्धेत चमकल्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेतही तिच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. या स्पर्धेत जपानविरुद्ध झालेल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात तिने १० धावा खर्च करून ४ गडी बाद केले होते.त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या फायनलमध्ये तिने २ गडी बाद केले. भारतीय संघाने हा सामना एकतर्फी जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरलं.
