Shreyanka Patil Injured in Womens t20 wc 2026 match: महिला टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात श्रेयंका पाटीलच्या रूपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. सहाव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या श्रेयंकाने पहिला चेंडू टाकला आणि त्यानंतर तिच्या पायाला जबर दुखापत झाली. त्यानंतर ती उजव्या पायावर उभीदेखील राहू शकत नाही. यानंतर तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. भारतीय संघासाठी या मोठ्या स्पर्धेच्या दृष्टीने हे दृश्य टेन्शन वाढवणारं होतं.

श्रेयंकाला मैदानात नेमकी कशी दुखापत झाली?

फिल्डिंग करताना चेंडू पकडण्यासाठी जाताच श्रेयंका अवघड पद्धतीने पाय मुरगळून मैदानावर पडली आणि ती वेदनेने विव्हळताना दिसली. चेंडू अडवताना तिच्या घोट्याला मुरगळल्याचं दिसून आलं. तत्काळ फिजिओ मैदानात दाखल होऊन तिची तपासणी करू लागले. राऊंड द विकेट येत श्रेयंकाने मधल्या स्टंपवर फ्लाइटेड चेंडू टाकला. मोल्केनबोअरने तो ऑन-साइडला ढकलला. मिडविकेटवर चेंडू अडवण्यासाठी जाताना श्रेयंका त्याच्या मागे धावली, मात्र त्याच प्रयत्नात तिला दुखापत झाली.

श्रेयंकाचा पाय इतक्या विचित्र पद्धतीने मुरगळला की उजव्या पायावर तिला उभेही राहता येत नसून तिला स्ट्रेचरवरून बग्गीतून मैदानाबाहेर नेण्यात आलं. लागोपाठ झालेल्या अनेक दुखापतींमुळे ती वर्षभराहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर होती. यंदाच्या महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) पुनरागमन केल्यानंतर या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यासाठी ती उत्सुक होती. या दुखापतीनंतर आता श्रेयंका स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळणार की नाही, असा सर्वांना प्रश्न पडला आहे.

तत्पूर्वी, भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकात इतिहास घडवला. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत २० षटकांत ५ बाद २०९ धावांचा प्रचंड डोंगर उभारला. महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच, या स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही आशियाई संघाने नोंदवलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

या सामन्यात भारताने केवळ २०० हून अधिक धावांचा टप्पा पहिल्यांदाच गाठला नाही, तर महिला टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. यापूर्वी, इंग्लंडने १२ जून २०२६ रोजी बांगलादेशविरुद्ध २१९ धावा केल्या होत्या, जी आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे . तसेच २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध २१३ धावा केल्या होत्या. आता भारतीय संघाने अव्वल तीन संघांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.