अविष्कार देशमुख

भारत-बांगलादेश क्रिकेट मालिका

संघ व्यवस्थापनाने दिलेल्या चौथ्या क्रमांकाच्या जबाबदारीला न्याय दिल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

‘‘कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला मला आवडते; परंतु गेल्या काही महिन्यांत मी स्वत:ला सिद्ध केले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा जेव्हा झटपट बाद होतात अशा वेळी फलंदाजीची सर्व भिस्त ही चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूवर येते. त्यामुळे नैसर्गिक खेळावर भर देत केलेल्या माझ्या कामगिरीबाबत मी समाधानी आहे,’’ असे श्रेयसने सांगितले.

एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची चिंता तीव्रतेने भेडसावली होती. त्या वेळी विजय शंकरला या स्थानावर पाठवण्याचा केलेला प्रयोग हा अपयशी ठरला होता. मात्र बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवणाऱ्या श्रेयसने चौथ्या स्थानाला न्याय दिला आहे.

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात श्रेयसने पाच षटकार आणि दोन चौकारांसह फक्त ३३ चेंडूंत ६२ धावांची खेळी साकारली. मोठय़ा फटक्यांबाबत श्रेयस म्हणाला, ‘‘चेंडू माझ्या कक्षात येतो, तेव्हा मला स्वत:वर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. हा चेंडू कसा थेट सीमारेषेबाहेर जाईल, याचाच विचार मी करत असतो. फलंदाजीवर आल्यावर मी सुरुवातीला दहा चेंडू खेळपट्टी समजण्यासाठी घेतले. मात्र त्यानंतर माझ्या नैसर्गिक खेळावर भर दिला.’’

‘‘मी एकाच षटकात मारलेल्या तीन षटकारांमुळेच आम्ही मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरलो. अन्यथा संघाचा डाव १५० किंवा १५५ धावांवर रोखला गेला असता तर तो अखेरच्या चेंडूपर्यंत रंगण्याची शक्यता होती,’’ असे श्रेयस या वेळी म्हणाला.

‘‘खेळपट्टीवर दव होते, त्यामुळे चेंडू थांबून येत होते. या स्थितीत माझ्याकडून खेळी साकारली गेल्याने मला स्वत:चा अभिमान वाटतो. त्याशिवाय लोकेश राहुलनेही संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याचाही फायदा झाला. दीपक चहर आणि शिवम दुबे यांच्या प्रयत्नांनी सामन्याच्या निकालाला कलाटणी मिळाली. त्यामुळेच आम्ही विजयावर शिक्कामोर्तब करू शकलो,’’ असे श्रेयसने सांगितले.

बांगलादेशकडून बरेच काही शिकण्यासारखे!

बांगलादेशच्या कामगिरीबद्दल विश्लेषण करताना श्रेयस म्हणाला, ‘‘मी गेल्या दोन वर्षांपासून बांगलादेश संघाला पाहात आहे. त्यांचा भारताविरुद्धचा सामना नेहमीच रंगतदार होतो. त्यांची फलंदाजी तोडीस तोड आहे. ते नेहमी गोलंदाजांना अडचणीत आणताना दिसतात. त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखेही आहे. आम्ही सरावात त्यांचे काही गुण आत्मसात करण्यासारखे असल्याची चर्चा केली होती.’’

‘‘बांगलादेशचा संघ उत्कृष्ट आहे. सामन्याच्या मधल्या काळात आमच्यावर दडपण प्रखरपणे जाणवत होते. याची जाणीव होताच रोहितने सर्वाना काही सूचना दिल्या. त्यामुळे सर्वामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल सुरूकेली,’’ असेही श्रेयसने सांगितले.

फलंदाजांमुळे मालिका विजयाची संधी गमावली – महमुदुल्ला

आमच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. मात्र काही फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे आम्ही मालिका जिंकण्याची संधी गमावली, असे मत बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाने व्यक्त केले.

‘‘तिन्ही सामन्यांत आम्ही केलेल्या बऱ्याच चुका एकसारख्या होत्या. अखेरच्या सामन्यात मोठी भागीदारी होणे अपेक्षित होते. मात्र दोन फलंदाज आम्ही लवकर गमावले. मोहम्मद नईम व मोहम्मद मिथुनव्यतिरिक्त कोणीही अधिक काळ खेळपट्टीवर टिकू शकले नाही,’’ असेही महमुदुल्लाने सांगितले.