Abhishek Nayar On Rohit Sharma: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील ४ सामने झाल्यानंतर भारतीय संघ ३-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिकेतील अंतिम सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. श्रेयस अय्यर कर्णधार बनल्यानंतर भारतीय संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. दरम्यान सामना गमावल्यानंतर श्रेयस अय्यर आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मालिकेतील चौथा सामना गमावल्यानंतर श्रेयस अय्यरने भारतीय फलंदाजांवर टीका केली होती. यावरून भारताचा माजी प्रशिक्षक अभिषेक नायरने रोहित शर्माचं उदाहरण देत मोठं वक्तव्य केलं आहे.
गौतम गंभीरने ज्यावेळी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती, त्यावेळी अभिषेक नायर सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत होता. अभिषेक नायर म्हणाला, “रोहित शर्मा कधीच बाहेर येऊन दुसऱ्यांना दोष देत नव्हता. याउलट तो पराभवाची जबाबदारी घ्यायचा.” भारतीय संघाला आयर्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ ३-० ने पिछाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना गमावल्यानंतर श्रेयस अय्यरने रवी बिश्नोईवर पराभवाचं खापर फोडलं होतं.
जियोस्टारच्या एका कार्यक्रमात बोलताना अभिषेक नायर म्हणाला, “आमच्यावेळी रोहित शर्मा कर्णधार होता. मला अजूनही आठवतंय, मुंबईतील कसोटी सामना गमावल्यानंतर तो म्हणाला होता की, काही होत नाही, आम्ही बऱ्याच मालिका जिंकल्या आहेत. एक मालिका गमावली, मी या पराभवाची जबाबदारी घेतो. रोहित असा होता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “त्याची एक बाजू अशी होती की, संघातील वातावरण नेहमी खेळीमेळीचं राहायचं. भारतीय संघ जेव्हा हरतो, तेव्हा सर्वांना दुःख होतं. पण रोहितची सर्वात मोठी ताकद हीच होती की, तो आपल्या खेळाडूंची पूर्ण काळजी घ्यायचा. रोहितचं वैशिष्ट्य म्हणजे, जो जबाबदारी घ्यायचा. तो कधीच दुसऱ्यांवर खापर फोडायचा नाही.”
विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक मोठ्या मालिका जिंकल्या. यासह २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. ही स्पर्धा झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.
