Shresta Iyer On Shreyas Iyer Captaincy: भारतीय टी-२० संघात गेल्या एका महिन्यात मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. भारतीय संघाने भारतात झालेल्या टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना जेतेपदाचा मान पटकावला होता. पण फलंदाजीत सातत्य नसल्याने सूर्यकुमार यादवला कर्णधारपद आणि संघातील स्थान गमवावं लागलं होतं. त्याच्याजागी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय संघाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडविरुद्ध २-० ने टी-२० मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंडविरूद्ध खेळतानाही भारताने लागोपाठ २ सामने गमावले आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे टीका होत असताना, श्रेयसची बहीण श्रेष्ठा अय्यर आपल्या भावाच्या पाठीशी उभी राहिली आहे. सामने तर विराट, रोहित आणि धोनीनेही गमावले आहेत, असं वक्तव्य तिने एका पॉडकास्टमध्ये बोलताना केलं आहे.
श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यर ही अभिनेत्री आणि कोरियोग्राफर आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान तिने पंजाब किंग्ससाठी शेअर केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरुन तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं. आता श्रेयस भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. श्रेयसवर टीका होत असताना, तिने टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रेष्ठा अय्यर म्हणाली, “गोष्टी नेहमीच आपल्याला हव्या तशाच घडतील असं नसतं. बोलणं खूप सोपं आहे की, कर्णधारामुळे हरतोय. पण तुम्हाला हे माहीत नसतं की या पलीकडेही क्रिकेट आहे. तुम्हाला माहीत नसतं की, पिच कसं आहे. ते गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल की फलंदाजांसाठी हे तुम्हाला माहीत नसतं. कधी आपण टॉस जिंकतो, तर कधी टॉस हरतो. त्यात खूप गोष्टी असतात. पण तुम्हाला फक्त हेच दिसतं की, हा कर्णधार म्हणून कसा आहे. तुम्ही ते सामने पण पाहा, ज्यामध्ये त्याने कर्णधार म्हणून विजय मिळवून दिला आहे.”
तसेच ती पुढे म्हणाली की, “जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता, तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात. कर्णधार चांगला आहे की वाईट असं काही नाही. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी चांगलीच कामगिरी केली आहे. शुबमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनी तर लेजेंड आहेत. पण या लोकांनीही बरेच सामने गमावले आहेत. असं असतानाही जर तुम्ही फक्त श्रेयस अय्यर, श्रेयस अय्यर करत राहिलात, तर मग नक्कीच तुम्हाला त्याच्यापासून काहीतरी समस्या आहे.”
श्रेयस अय्यरला ज्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. त्यावेळी भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप चॅम्पियन म्हणून पहिल्यांदाच टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी समोर आयर्लंडचा संघ होता. त्यामुळे भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पहिल्या सामन्यात भारतीय संघाला आयर्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाला भारताला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला. याह भारताने पहिल्यांदाच आयर्लंडविरुद्ध खेळताना टी-२० मालिका गमावली. त्यानंतर इंग्लंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
