गावाची मोट बांधण्याचं काम सरपंच करतात. गावातले प्रश्न समजून ते सोडवणं, विविध सामाजिक स्तरातल्या माणसांना एकत्र आणणं, गावाला प्रगतीपथावर नेणं हे सगळं सरपंचांच्या नेतृत्वात होतं. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार झाल्यानंतर श्रेयस अय्यरला त्याच्या सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या स्वभावामुळे त्याला सरपंच ही बिरुदावली मिळाली. हे नाव देण्यात पंजाब किंग्ज संघाच्या सोशल मीडिया टीमचाही मोठा वाटा आहे. हळूहळू हे नाव रुजलं, लोकप्रिय झालं. विमानतळावर, प्रवासात, जाहीर कार्यक्रमात श्रेयसला या नावाने पुकारलं जाऊ लागलं. सुरुवातीला तो चकित होत असे. त्याने या नावाचे संदर्भ समजून घेतले. आता हे टोपणनाव त्याला आवडू लागलं आहे. दाक्षिणात्य पार्श्वभूमी असलेला आणि मुंबईतल्या मैदानांवर क्रिकेटची धुळाक्षरं गिरवलेला श्रेयस आता पंजाब दा पुत्तर होऊन सरपंच झाला आहे. निवडसमितीने शनिवारी सरपंच श्रेयसच्या टीम इंडियाचा कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केलं. जादूची कला अवगत असणाऱ्या श्रेयसने क्रिकेटच्या मैदानावर खणखणीत कामगिरीने जादू केली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन खणखणीत अर्धशतकांद्वारे श्रेयसने आगमनाची नांदी दिली. पुढच्याच वर्षी त्याने मुंबईसाठी पदार्पण केलं. मधल्या फळीत चांगली कामगिरी करू न शकलेल्या श्रेयसला सलामीला पाठवण्यात आलं. त्या वर्षी श्रेयसने ८०९ धावा करत दणकाच उडवला. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा धावांची टांकसाळ उघडत श्रेयसने ७३च्या सरासरीने १३२१ धावा चोपून काढल्या. मुंबईने ४१व्यांदा रणजी करंडक जेतेपदावर नाव कोरलं. फायनलमध्ये श्रेयसने शतकी खेळी साकारली होती.
यानंतर श्रेयसला भारतीय संघात घ्यावं अशी मागणी जोर धरू लागली. मात्र त्यानंतरही श्रेयसला टीम इंडियांची कॅप मिळायला दोन वर्ष प्रतीक्षा करावी लागली. २०१७ मध्ये श्रेयसने टी२० आणि वनडे पदार्पण केलं. २०२० मध्ये श्रेयसने हॅमिल्टनमध्ये वनडेत शतकी खेळी साकारली. वनडे संघात स्थिरावल्यानंतर २०२१ मध्ये श्रेयसने कसोटी पदार्पण केलं. शतक आणि अर्धशतकासह श्रेयसने निवडसमितीचा विश्वास सार्थ ठरवला. कारकिर्दीत सुरुवातीच्या टप्प्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी उसळते चेंडू श्रेयसचा कच्चा दुवा असल्याचं स्पष्ट झालं. श्रेयस खेळायला उतरला की उसळत्या चेंडूंचा मारा करून त्याला बाद केलं जाऊ लागलं. पत्रकार परिषदेत त्याला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात येऊ लागले. यावर उत्तर देताना श्रेयस एकदा चिडलाही होता. मात्र या कच्च्या दुव्यावर काम करत श्रेयसने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं.
हा कच्चा दुवा दूर केल्यानंतर श्रेयसच्या पाठीचं दुखणं बळावलं. याच दुखापतीमुळे त्याच्या खेळण्यात खंड पडला. दुखापतीमुळे रणजी करंडक स्पर्धेच्या एका लढतीतून माघार घेण्याचं निमित्त झालं आणि श्रेयससह इशान किशनला बीसीसीआयतर्फे वार्षिक करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून डच्चू देण्यात आला. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या निर्देशानुसार खेळाडूंनी राष्ट्रीय संघासाठी खेळण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं. आयपीएलसाठी राष्ट्रीय संघ तसंच डोमेस्टिक संघासाठी खेळणं बाजूला सारू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. रणजी करंडक स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये मुंबई आणि बडोदा संघ आमनेसामने होते. मात्र पाठीचं दुखण्याच्या कारणास्तव श्रेयस या लढतीत खेळला नाही. दरम्यान बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीतील स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसीनचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसचा दावा फेटाळला होता. श्रेयस फिट असून खेळण्यासाठी उपलब्ध आहे असं पटेल यांनी स्पष्ट केलं होतं. श्रेयसचं म्हणणं आणि नितीन पटेल यांचं वक्तव्य यामध्ये फारकत दिसून आली. याचा फटका श्रेयसला बसला.

पुढच्या वर्षभरात श्रेयसने विविध पातळ्यांवर स्वत:ला सिद्ध केलं. श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने जेतेपदावर नाव कोरलं. तब्बल दशकभरानंतर कोलकाताने जेतेपदावर कब्जा केला. श्रेयसने ३७ची सरासरी आणि १४६च्या स्ट्राईकरेटने ३५१ धावा करत संघासमोर कामगिरीचा वस्तुपाठच सादर केला. रणजी करंडक स्पर्धेत श्रेयसने महाराष्ट्राविरुद्ध शतकी खेळी साकारली. यासह त्याने तीन वर्षांचा फर्स्टक्लास शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने १९० चेंडूत १४२ धावांची खणखणीत खेळी केली. याआधी त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावलं होतं. ओडिशाविरुद्ध त्याने २३३ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली.
मिडास टच सिद्ध करत श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. श्रेयसने १८८च्या स्ट्राईकरेटने ३४५ धावा करत संघासमोर आदर्श ठेवला. यामध्ये एक शतकाचाही समावेश होता. या स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याची मुंबईची ही दुसरीच वेळ होती. सहा महिन्यानंतर श्रेयसचं भारतीय संघात पुनरागमन झालं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली. विराट कोहलीला दुखापत झाल्याने श्रेयसचा खेळण्याचा मार्ग सुकर झाला. ५९, ४४, ७८ अशा खेळींसह श्रेयसने निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत १५,५६, ७९, ४५, ४८ अशा खेळींसह श्रेयसने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.
वर्षभरातल्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने श्रेयसचं नाव पुन्हा समाविष्ट केलं. ब श्रेणीत त्याला स्थान मिळालं आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. जून २०२५ मध्येही श्रेयस भारतीय वनडे आणि टी२० कर्णधारपदासाठी शर्यतीत होता. मात्र निवडसमितीने भविष्याचा विचार करून शुबमन गिलकडे टेस्टचं नेतृत्व सोपवलं. रोहित शर्माने टी२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. एवढं सगळं असलं तरी आशिया चषकासाठी श्रेयसची संघात निवडही झाली नाही. निवड न होण्यात श्रेयसचा काहीही दोष नाही,आमचाही नाही. त्याची कामगिरी पुरेशी बोलकी आहे. पण त्याला संधीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. श्रेयससाठी कोणाला वगळायचं असा प्रश्न आहे. १५ जणांचीच निवड होऊ शकते असं निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले होते. श्रेयसची रिझर्व्ह अर्थात राखीव खेळाडूंमध्येही निवड झाली नाही.

टी२०चा संभाव्य कर्णधार पण संघातच नाही
आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यर हे नाव म्हणजे मिडास टच झालं आहे. श्रेयसकडे नेतृत्व सोपवा- तो संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल. दोन महिने चालणाऱ्या प्रदीर्घ स्पर्धेत एकेक सामना जिंकण अवघड असताना श्रेयसने तीन संघांना आयपीएल फायनलमध्ये नेलं आहे. यापैकी कोलकाताने जेतेपदावर नाव कोरलं. इतकी वर्ष खेळूनही जेतेपदापासून दूर राहिलेल्या पंजाब आणि दिल्ली या संघांनी श्रेयसच्या नेतृत्वात फायनलचा टप्पा गाठलेला आहे. यंदाही श्रेयसच्या नेतृत्वात पंजाबचा संघ दमदार कामगिरी करतो आहे. नेतृत्वाच्या बरोबरीने श्रेयसची बॅट बोलते आहे. श्रेयससाठी पंजाबने २६.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती. हे सगळं नावावर असलेल्या श्रेयसने भारतासाठी शेवटचा टी२० सामना कधी खेळलाय माहितेय का? जवळपास तीन वर्षांपूर्वी.
धक्का बसला ना, पण हे खरंय. श्रेयस अय्यरने भारतासाठी शेवटचा टी२० सामना ३ डिसेंबर २०२३ रोजी खेळला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. पाचवा आणि अंतिम सामना बंगळुरूत झाला होता. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. श्रेयसच्याच अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने १६० धावांची मजल मारली. श्रेयसने ५ चौकार आणि २ षटकारांसह ३७ चेंडूत ५३ धावांची सुरेख खेळी साकारली होती. अक्षर पटेलने ३१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियातर्फे जेसन बेहनड्रॉफ आणि बेन ड्वारिशॉय यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेन मॅकडरमॉटच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलिया जिंकणार अशी चिन्हं होती मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. ऑस्ट्रेलियाला १५४ धावाच करता आल्या. मॅकडरमॉटने ५४ धावांची खेळी केली. भारताकडून मुकेश कुमारने ३ तर अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. अक्षर पटेलला सामनावीर तर रवी बिश्नोईला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघाने ही मालिका ४-१ फरकाने जिंकली.
त्यानंतर भारतीय संघ ६६ टी२० सामने खेळला आहे. पण श्रेयस अय्यरचा निवडीसाठी विचार झाला नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या टी२० लीग स्पर्धेत विजयी संघाचं नेतृत्व करणाऱ्या तसंच या स्पर्धेत सातत्याने धावांची टांकसाळ उघडणाऱ्या खेळाडूचा राष्ट्रीय संघासाठी विचारही होऊ नये हे चाहत्यांसाठी अनाकलनीय आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवस तो आयसीयूमध्ये होता. तब्येत बरी झाल्यानंतरही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तो ऑस्ट्रेलियातच होता. तीन महिन्यांच्या अतिशय खडतर रिहॅब प्रक्रियेनंतर श्रेयसने पुनरागमन केलं.
नावावर चांगली कामगिरी असूनही श्रेयसची मायदेशात झालेल्या टी२० वर्ल्डकपसाठी संघात निवड होऊ शकली नाही. निवडसमितीने श्रेयस अय्यरऐवजी तिलक वर्माच्या नावाला पसंती दिली.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरीचा चढता आलेख
२०१५ मध्ये श्रेयसचा आयपीएल प्रवास सुरू झाला. त्याच वर्षी श्रेयसने ४३९ धावा फटकात सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार किती योग्य होता हे श्रेयसने कारकिर्दीचा आलेख उंचावता राखत सिद्ध केलं. पुढच्या सहा हंगामात श्रेयस दिल्लीचा मधल्या फळीतला मुख्य फलंदाज झाला.
२०२४ हंगामात श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल जेतेपदावर कब्जा केला. २०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने १२.२५ कोटी रुपये खर्चून श्रेयसला ताफ्यात समाविष्ट केलं होतं पण २०२३ हंगामात दुखापतीमुळे श्रेयस खेळू शकला नाही. श्रेयसच्या अनुपस्थितीत नितीश राणाने संघाचं नेतृत्व केलं होतं. २०२४ मध्ये फिट होऊन परतलेल्या श्रेयसने नेतृत्वगुणांची झलक सादर केली. श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने जेतेपदावर नाव कोरलं. तब्बल दशकभरानंतर कोलकाताने जेतेपदावर कब्जा केला. श्रेयसने ३७ची सरासरी आणि १४६च्या स्ट्राईकरेटने ३५१ धावा करत संघासमोर कामगिरीचा वस्तुपाठच सादर केला.
मात्र त्याच वर्षी श्रेयस आणि कोलकाताचे ऋणानुबंध संपुष्टात आले. ज्या कर्णधाराच्या नेतृत्वात आयपीएल जेतेपद पटकावलं त्यालाच रिटेन करण्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अपयश आलं. कोलकाता संघाने रिटेन केलेल्या सहा खेळाडूंची यादी जाहीर केली मात्र त्यात श्रेयसच्या नावाचा समावेश नव्हता. श्रेयसला रिटेन करण्यासाठी उत्सुक असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी सांगितलं. मात्र मार्केटव्हॅल्यू नेमकी किती आहे हे जाणून घेण्यासाठी लिलावात जाऊ इच्छितो अशी श्रेयसची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. आयपीएल जेतेपद पटकावून देऊनही कर्णधार बाजूला झाल्याचं पाहायला मिळालं. २०२५ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने श्रेयससाठी बोली लावली मात्र १० कोटींच्या पलीकडे जाताच त्यांनी माघार घेतली. श्रेयससाठी लखनौ तसंच पंजाब संघ आतूर होते. अखेर पंजाबने २६.७५ कोटी रुपये मोजून श्रेयसला ताफ्यात समाविष्ट केलं. आयपीएल इतिहासातला दुसरी सगळ्यात मोठी बोली लागलेला खेळाडू ठरला.
श्रेयसच्या नेतृत्वात पंजाब किंग्ज संघाने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांना नमवलं. तीन आयपीएल फायनलमध्ये धडक मारून देणारा तो केवळ तिसरा कर्णधार ठरला. याआधी अशी कामगिरी रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी केली होती. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्ली, कोलकाता आणि पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली. श्रेयसने ५०.३३च्या सरासरीने ६०४ धावा केल्या.
कोट्यधीश श्रेयस
पदार्पणापासून आतापर्यंत श्रेयसची आयपीएलमधली कामगिरी दमदार अशी राहिली आहे. मधल्या फळीतील फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि कर्णधार म्हणून श्रेयसने स्वत:ला सिद्ध केलं आहे. याची परिणती श्रेयसच्या मानधनात दिसून येते. कारकिर्दीच्या सुरुवातीला श्रेयस दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता आणि त्याचं मानधन होतं २.६० कोटी. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याचं मानधन झालं ७ कोटी. २०२२ हंगामापूर्वीच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटी रुपये मोजून त्याला ताफ्यात घेतलं. श्रेयसच्या नेतृत्वातच कोलकाताने जेतेपदावर नाव कोरलं. मात्र त्यानंतर श्रेयसने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्जने २६.७५ कोटी एवढी प्रचंड बोली लावून त्याला संघात समाविष्ट केलं आणि लगेचच कर्णधारही केलं. श्रेयसची कामगिरी मानधनाला साजेशी आहे.
