Shreyas Iyer Captaincy Record: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना सुरु आहे. बेलफास्टमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात श्रेयस अय्यर पहिल्यांदाच भारतीय टी-२० संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. श्रेयसला टी-२० संघाचं नेतृत्व करण्याची संधी सहजासहजी मिळालेली नाही. आयपीएलच्या गेल्या काही हंगामांमध्ये त्याने कर्णधार म्हणून आपला ठसा उमटवला आहे. यासह देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने मुंबईचा कर्णधार म्हणूनही दमदार कामगिरी केली. आता पहिल्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर पुढच्या हंगामात त्याने पंजाब किंग्स संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं होतं. आयपीएल २०२६ स्पर्धेतही त्याने कर्णधार म्हणून आपली छाप सोडली होती. दरम्यान सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर ही जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. श्रेयसला ११४ टी-२० सामन्यांमध्ये नेतृत्व केल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. श्रेयसने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. रोहितने ८० टी-२० सामन्यांमध्ये नेतृत्व केल्यानंतर, पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. तर विराट कोहलीने ७२ सामन्यांनंतर भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.
भारतीय टी-२० आंतरराष्ट्रीय (T20I) कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या वेळी सर्वाधिक टी-२० सामन्यांमध्ये नेतृत्व करणारे खेळाडू
श्रेयस अय्यर- ११४ सामने
रोहित शर्मा- ८० सामने
विराट कोहली- ७२ सामने
केएल राहुल- ४२ सामने
ऋषभ पंत- ३० सामने
शिखर धवन- २१ सामने
यासह श्रेयस अय्यरच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. श्रेयस अय्यर हा भारतीय टी-२० संघासाठी कर्णधार म्हणून पदार्पण करणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यरने वय ३१ वर्षे २०२ दिवस असताना भारतासाठी कर्णधार म्हणून पदार्पण केलं आहे. या यादीत शिखर धवन अव्वल स्थानी आहे. शिखर धवनने वय ३५ वर्षे २३२ दिवस असताना भारतासाठी कर्णधार म्हणून पदार्पण केलं होतं.
टी-२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून पदार्पण करणारे सर्वात वयस्कर खेळाडू
शिखर धवन- ३५ वर्षे, २३२ दिवस
सूर्यकुमार यादव- ३३ वर्षे, ७० दिवस
श्रेयस अय्यर- ३१ वर्षे, २०२ दिवस
रोहित शर्मा- ३० वर्षे, २३४ दिवस
केएल राहुल- ३० वर्षे, १४३ दिवस
