Shreyas Iyer Breaks Virat Kohli Record: लखनौतील एकाना स्टेडियमवर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होत. यादरम्यान त्याने १०२ धावांची वादळी शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ६ गगनचुंबी षटकार खेचले. या खेळीच्या बळावर त्याने भारतीय संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला. यादरम्यान शतक पूर्ण करताच त्याच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झाली आहे.

श्रेयस अय्यरने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड

या सामन्यात भारतीय संघ १७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. त्यामुळे श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी होती. श्रेयसने इशान किशनसोबत मिळून भारतीय संघाचा डाव सावरला. यादरम्यान श्रेयसने षटकार खेचून ४२ चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलंच शतक आहे. यासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना शतक झळकावणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. यासह त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. याआधी धावांचा पाठलाग करताना सर्वात मोठी खेळी करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने ६ डिसेंबर २०१९ ला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी केली होती. आता श्रेयस अय्यरने १०२ धावांची खेळी करून हा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय कर्णधार

श्रेयस अय्यर हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय कर्णधार आहे. याआधी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने हा पराक्रम केला आहे. रोहित शर्माच्या नावे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ३ शतकं झळकावण्याची नोंद आहे. तर सूर्यकुमार यादवने एक शतक झळकावलं आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावताच श्रेयस अय्यर भारतासाठी शतक झळकावणारा तिसरा कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाचा दमदार विजय

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून शेरफेन रुदरफोर्डने सर्वादिक ५६ धावांची खेळी केली. तर शे होपने ५२ धावा केल्या. वेस्ट इंडिजने २० षटकांअखेर १७१ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून श्रेयस अय्यरने १०२ आणि इशान किशनने ३७ धावांची खेळी करून भारतीय संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.