आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यर हे नाव म्हणजे मिडास टच झालं आहे. श्रेयसकडे नेतृत्व सोपवा- तो संघाला फायनलमध्ये घेऊन जाईल. दोन महिने चालणाऱ्या प्रदीर्घ स्पर्धेत एकेक सामना जिंकण अवघड असताना श्रेयसने तीन संघांना आयपीएल फायनलमध्ये नेलं आहे. यापैकी कोलकाताने जेतेपदावर नाव कोरलं. इतकी वर्ष खेळूनही जेतेपदापासून दूर राहिलेल्या पंजाब आणि दिल्ली या संघांनी श्रेयसच्या नेतृत्वात फायनलचा टप्पा गाठलेला आहे. यंदाही श्रेयसच्या नेतृत्वात पंजाबचा संघ दमदार कामगिरी करतो आहे. नेतृत्वाच्या बरोबरीने श्रेयसची बॅट बोलते आहे. श्रेयससाठी पंजाबने २६.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती. हे सगळं नावावर असलेल्या श्रेयसने भारतासाठी शेवटचा टी२० सामना कधी खेळलाय माहितेय का? जवळपास तीन वर्षांपूर्वी.

धक्का बसला ना, पण हे खरंय. श्रेयस अय्यरने भारतासाठी शेवटचा टी२० सामना ३ डिसेंबर २०२३ रोजी खेळला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. पाचवा आणि अंतिम सामना बंगळुरूत झाला होता. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. श्रेयसच्याच अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने १६० धावांची मजल मारली. श्रेयसने ५ चौकार आणि २ षटकारांसह ३७ चेंडूत ५३ धावांची सुरेख खेळी साकारली होती. अक्षर पटेलने ३१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियातर्फे जेसन बेहनड्रॉफ आणि बेन ड्वारिशॉय यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बेन मॅकडरमॉटच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलिया जिंकणार अशी चिन्हं होती मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. ऑस्ट्रेलियाला १५४ धावाच करता आल्या. मॅकडरमॉटने ५४ धावांची खेळी केली. भारताकडून मुकेश कुमारने ३ तर अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या होत्या. अक्षर पटेलला सामनावीर तर रवी बिश्नोईला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघाने ही मालिका ४-१ फरकाने जिंकली.

त्यानंतर भारतीय संघ ६६ टी२० सामने खेळला आहे. पण श्रेयस अय्यरचा निवडीसाठी विचार झाला नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या टी२० लीग स्पर्धेत विजयी संघाचं नेतृत्व करणाऱ्या तसंच या स्पर्धेत सातत्याने धावांची टांकसाळ उघडणाऱ्या खेळाडूचा राष्ट्रीय संघासाठी विचारही होऊ नये हे चाहत्यांसाठी अनाकलनीय आहे.

२०२४ हंगामात श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल जेतेपदावर कब्जा केला. २०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने १२.२५ कोटी रुपये खर्चून श्रेयसला ताफ्यात समाविष्ट केलं होतं पण २०२३ हंगामात दुखापतीमुळे श्रेयस खेळू शकला नाही. श्रेयसच्या अनुपस्थितीत नितीश राणाने संघाचं नेतृत्व केलं होतं. २०२४ मध्ये फिट होऊन परतलेल्या श्रेयसने नेतृत्वगुणांची झलक सादर केली. श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने जेतेपदावर नाव कोरलं. तब्बल दशकभरानंतर कोलकाताने जेतेपदावर कब्जा केला. श्रेयसने ३७ची सरासरी आणि १४६च्या स्ट्राईकरेटने ३५१ धावा करत संघासमोर कामगिरीचा वस्तुपाठच सादर केला.

मात्र त्याच वर्षी श्रेयस आणि कोलकाताचे ऋणानुबंध संपुष्टात आले. ज्या कर्णधाराच्या नेतृत्वात आयपीएल जेतेपद पटकावलं त्यालाच रिटेन करण्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अपयश आलं. कोलकाता संघाने रिटेन केलेल्या सहा खेळाडूंची यादी जाहीर केली मात्र त्यात श्रेयसच्या नावाचा समावेश नव्हता. श्रेयसला रिटेन करण्यासाठी उत्सुक असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी सांगितलं. मात्र मार्केटव्हॅल्यू नेमकी किती आहे हे जाणून घेण्यासाठी लिलावात जाऊ इच्छितो अशी श्रेयसची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. आयपीएल जेतेपद पटकावून देऊनही कर्णधार बाजूला झाल्याचं पाहायला मिळालं. २०२५ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने श्रेयससाठी बोली लावली मात्र १० कोटींच्या पलीकडे जाताच त्यांनी माघार घेतली. श्रेयससाठी लखनौ तसंच पंजाब संघ आतूर होते. अखेर पंजाबने २६.७५ कोटी रुपये मोजून श्रेयसला ताफ्यात समाविष्ट केलं. आयपीएल इतिहासातला दुसरी सगळ्यात मोठी बोली लागलेला खेळाडू ठरला.

आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरीसह श्रेयसच्या मानधनात अचंबित करणारी वाढ झाली आहे.

वर्षनिहाय आयपीएल मानधन

२०१५- दिल्ली कॅपिटल्स- २.६० कोटी
२०१६- दिल्ली कॅपिटल्स- २.६० कोटी
२०१७- दिल्ली कॅपिटल्स- २.६० कोटी
२०१८- दिल्ली कॅपिटल्स- ७ कोटी
२०१९- दिल्ली कॅपिटल्स- ७ कोटी
२०२०-दिल्ली कॅपिटल्स- ७ कोटी
२०२१- दिल्ली कॅपिटल्स- ७ कोटी
२०२२- कोलकाता नाईट रायडर्स- १२.२५ कोटी
२०२३- कोलकाता नाईट रायडर्स- १२.२५ कोटी
२०२४- कोलकाता नाईट रायडर्स- १२.२५ कोटी
२०२५- पंजाब किंग्ज- २६.७५ कोटी
२०२६- पंजाब किंग्ज- २६.७५ कोटी

श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. सहा महिन्यानंतर श्रेयसचं भारतीय संघात पुनरागमन झालं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली. विराट कोहलीला दुखापत झाल्याने श्रेयसचा खेळण्याचा मार्ग सुकर झाला. ५९, ४४, ७८ अशा खेळींसह श्रेयसने निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत १५,५६, ७९, ४५, ४८ अशा खेळींसह श्रेयसने वनडेत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

श्रेयसच्या नेतृत्वात पंजाब किंग्ज संघाने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांना नमवलं. तीन आयपीएल फायनलमध्ये धडक मारून देणारा तो केवळ तिसरा कर्णधार ठरला. याआधी अशी कामगिरी रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी केली होती. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्ली, कोलकाता आणि पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली. श्रेयसने ५०.३३च्या सरासरीने ६०४ धावा केल्या.

एकाक्षणी भारताचा वनडे तसंच टी२० कर्णधार होण्यासाठी शर्यतीत असलेल्या श्रेयसची आशिया चषक स्पर्धेसाठीही निवड झाली नाही. २०२५ आशिया चषक स्पर्धा टी२० प्रकारातच खेळवण्यात आली होती.

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला येतात. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून इशान किशनने भारतीय टी२० संघात स्थान पटकावलं. कर्णधार सूर्यकुमार यादव मधल्या फळीचा आधारस्तंभ आहे. मधल्या फळीत श्रेयसचा विचार होऊ शकतो पण तिलक वर्माने ही जागा पटकावली. शिवम दुबे, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे अष्टपैलू कामगिरी बजावतात. वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग गोलंदाजीची धुरा सांभाळतात.

गेल्या तीन वर्षांमध्ये भारतासाठी टी२० प्रकारात सर्वाधिक धावा कर्णधार सूर्यकुमारने केल्या आहेत. युवा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा दुसऱ्या स्थानी तर तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी आहे. तिलकने संधीचं सोनं केल्यामुळे श्रेयसला अंतिम अकरात येणं अवघड झालं आहे.