सूर्यकुमार यादवनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर प्रबळ दावेदार असेल, असे मत पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने मार्च महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषक उंचावला होता. मात्र, गेल्या दीड वर्षात सूर्यकुमारने फलंदाजीत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे राष्ट्रीय संघातील स्थान धोक्यात आले आहे.
‘‘ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व करण्यासाठी भारताकडे अनेक दावेदार आहेत. परंतु माझ्या मते श्रेयस अय्यर त्या दावेदारांमध्ये आघाडीवर आहे. यंदा ‘आयपीएल’च्या सुरुवातीपासूनच त्याने ट्वेन्टी-२० खेळाडू म्हणून स्वत:चा उच्च दर्जा सिद्ध केला. तो आता पूर्वीपेक्षा अधिक परिपक्व झाला आहे. सध्या त्याचा खेळ सर्वोच्च पातळीवर आहे,’’ असे पॉन्टिंगने सांगितले.
श्रेयस सध्या भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा भाग नसला, तरीही क्रिकेटच्या लघुत्तम प्रारूपात त्याला कर्णधार बनविण्याबाबत चर्चा सुरू आहे. कर्णधार म्हणून श्रेयसने ‘आयपीएल’मध्ये छाप पाडली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्स संघाने २०२४च्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर २०२५ मध्ये पंजाबचे नेतृत्व करताना श्रेयसने संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात पंजाबने सुरुवात दमदार केली होती.
तसेच श्रेयस भारताच्या ट्वेन्टी-२० संघात नसल्याचे आपल्याला आश्चर्य वाटते असेही पॉन्टिंग म्हणाला. ‘‘श्रेयसने प्रभावी कामगिरी केली आहे. आता तो कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याला नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास तो त्याचा पूर्ण फायदा घेईल. त्यामुळे भारतीय संघासाठी त्याचा निश्चितपणे विचार झाला पाहिजे.’’
