India vs Afghanistan T20 Series Win Shreyas Iyer Gesture News Marathi: भारताने अफगाणिस्तानविरूद्धचा तिसरा टी-२० सामना १२७ धावांनी जिंकत मालिकेत निर्भेळ विजय मिळवला. तिसरा टी-२० सामना जिंकताच भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिन्ही सामने जिंकले. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने व टीम इंडियाने विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर जी कृती केली, त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंचं कौतुक केलं जात आहे.

अफगाणिस्तानविरूद्ध या टी-२० मालिकेत भारतीय संघ आपल्याच घरच्या मैदानावर पाहुणा संघ होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही तीन सामन्यांची टी-२० मालिका भारतात खेळवली असली तरी या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे होतं. या दोन्ही संघांमधील या मालिकेला फ्रेंडशिप कप असं नाव देण्यात आलं होतं. भारताने ही मालिका जिंकल्यानंतर मैदानावर असा एक क्षण पाहायला मिळाला, जो आजवर क्रिकेट इतिहासात कधी पाहिला नसेल. श्रेयस अय्यर व टीम इंडियाने नेमकं काय केलं पाहूया.

भारताने टी-२० मालिका जिंकल्यानंतर श्रेयस अय्यरने सामन्यानंतर प्रझेंटेशन सेरेमनीमध्ये संवाद साधला. त्यानंतर तो ट्रॉफी स्वीकारण्यासाठी गेला, तिथे आधीच दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली उपस्थित होते. ट्रॉफी घेण्यासाठी जाताना श्रेयस अय्यरने खुणावत इब्राहिम झादरानला बोलावून घेतलं. यासह दोघांनी ती फ्रेंडशिप ट्रॉफी स्वीकारली आणि टीम इंडियाचे खेळाडू उभे होते त्या दिशेने गेले.

ट्रॉफी कोणाच्या हातात देण्यापेक्षा चॅम्पियन लिहिलेल्या बोर्डासमोर ही ट्रॉफी दोन्ही कर्णधारांनी खाली ठेवली आणि त्यानंतर इब्राहिम झाद्रान ट्रॉफी ठेवून खेळाडूंना हात मिळवत जाणार तितक्यात संजू सॅमसन, इशान किशन व इतर खेळाडूंनीही त्याला फोटो काढण्यासाठी बोलावलं. दोन्ही संघांचे कर्णधार व टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकत्र ग्रुप फोटो क्लिक केला. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार विजेत्या संघाला ट्रॉफी देत फोटो काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. क्रिकेट इतिहासात हे दृश्य पहिल्यांदात पाहायला मिळालं असेल.

यापूर्वी अफगाणिस्तानविरूद्ध २०१८ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत भारताने विजय मिळवत मालिका जिंकली होती. या विजयानंतर भारतीय संघाला जेतेपदाचा करंडक देण्यात आला. कर्णधार अजिंक्य रहाणेने करंडक स्वीकारला. भारतीय खेळाडू जेतेपदासह फोटो काढण्यासाठी जमले. त्याचवेळी अजिंक्यने बाजूला उभ्या असलेल्या अफगाणिस्तानच्या संघातील सर्व खेळाडूंना बोलावलं. अजिंक्यच्या सूचनेने ते भारावून गेले. अफगाणिस्तानचे सगळे खेळाडू जमले. दोन्ही संघ एकत्र आणि जेतेपदाचा करंडक असा फोटो काढण्यात आला. फोटोनंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी तसंच त्यांच्या बोर्डानेही अजिंक्यच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं होतं.