Shreyas Iyer Rib Injury Details: ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका रोहित शर्माचे शतक वगळता भारतीय संघासाठी फारशी चांगली ठरली नाही. वनडे मालिकेत संघाला २-१ ने पराभव पत्करावा लागला. यादरम्यान वनडे संघाचा महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यरला सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. श्रेयस अय्यरला फिल्डिंग करताना गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुखापतीनंतर श्रेयसची अवस्था कशी होती, याबाबत माहिती समोर आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारत आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भिडताना दिसणार आहे. भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. कसोटी सामने १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे सुरू होतील. यानंतर वनडे मालिकेसाठीदेखील संघाची घोषणा करण्यात येणार आहे. पण या मालिकेत श्रेयस अय्यर खेळणार की नाही याबाबत शंका असेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरला दुखापतीनंतर बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होता. यानंतर श्रेयस अय्यर दुखापतीतून हळूहळू बरा होत आहे. श्रेयर अय्यरच्या फिटनेसबाबत निवड समितीला माहिती देण्यात आली आहे आणि वैद्यकीय अहवालानुसार त्याला पूर्णपणे मॅच-फिट होण्यासाठी अजून किमान महिनाभर लागणार आहे. पण या दुखापतीनंतर श्रेयस अय्यरची प्रकृती खूप गंभीर होती, याबाबत आता खुलासा झाला आहे.
गंभीर दुखापतीनंतर कशी होती श्रेयस अय्यरची अवस्था?
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना भारतीय क्रिकेट बोर्डातील एका सूत्राने सांगितले, “त्याला पूर्ण फिटनेस मिळवण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. बोर्ड आणि निवड समितीला त्याच्या दुखापतीनंतर पुनरागमनाची घाई करायची नाही. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका वनडे मालिका खेळेल की नाही याबाबत शंका आहे.”
सूत्रांनी सांगितलं की, अय्यरचा ऑक्सिजन लेव्हल ५० पर्यंत खाली गेली होती आणि सुमारे दहा मिनिटांपर्यंत तो नीट उभाही राहू शकला नाही. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली होती आणि त्याला नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागला.
श्रेयस अय्यरला गेल्या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अॅलेक्स केरीचा कॅच झेलण्यासाठी अय्यरने डाइव मारली आणि जमिनीवर पडताना त्याला डाव्या बाजूला दुखापत झाली. त्यानंतर त्याला अंतर्गत रक्तस्रावासह प्लीहा (spleen) वर झालेल्या जखमेच्या कारणामुळे सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती बिघडल्याने आयसीयुमध्येही दाखल करण्यात आलं होतं. यासह तो आठवडाभर हॉस्पिटलमध्ये दाखल होता.हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरने काही दिवसांनी बीचवर वेळ घालवातानाचा फोटो शेअर करत त्याच्या प्रकृतीचे स्वत: अपडेट दिले होते.
