वृत्तसंस्था, मुंबई: भारतीय ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सलग तिसर्यांदा मुंबईकराकडेच राहण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यानंतर आता श्रेयस अय्यरला ट्वेन्टी-२० संघाच्या नेतृत्वाची धुरा दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौरा, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या ट्वेन्टी-२० संघाची आज, शनिवारी घोषणा केली जाणार असून या वेळी श्रेयसच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल असे समजते.
भारतीय संघ आयर्लंडमध्ये दोन ट्वेन्टी-२० सामने (२६ आणि २८ जून) खेळणार असून त्यानंतर इंग्लंडमध्ये दाखल होईल. १ जुलैपासून सुरू होणार्या मालिकेत भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणे नियोजित आहे. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपान येथे आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. यापैकी आयर्लंड आणि इंग्लंड दौर्यासाठी ट्वेन्टी-२० संघांचे कर्णधारपद श्रेयसकडेच सोपवले जाणे अपेक्षित आहे. उपकर्णधारपदासाठी तिलक वर्माचे नाव चर्चेत आहे. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रेयसला विश्रांती देऊन तिलकला नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
भारतीय संघाने याच वर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली. मात्र, सूर्यकुमार आता केवळ कर्णधारपदच नाही, तर संघातील स्थानही गमावणार असल्याचे समजते. गेल्या १८ महिन्यांत सूर्यकुमारने फलंदाजीत सुमार कामगिरी केली. त्यामुळे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. आता ३५ वर्षीय सूर्यकुमारची जागा त्याचा ३१ वर्षीय मुंबईकर सहकारी श्रेयस घेईल.
श्रेयस २०२३ सालापासून भारतीय ट्वेन्टी-२० संघातून बाहेर आहे. मात्र, या काळात त्याने ‘आयपीएल’मध्ये फलंदाज आणि कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली. त्यामुळे निवड समितीला श्रेयसच्या नेतृत्वगुणांवर पूर्ण विश्वास आहे.
