Shubman Gill Shreyas Iyer India Captain Change New Zealand ODIs: भारतीय क्रिकेट संघ सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जपान संघाबरोबर टी-२० सामना खेळणार आहे. यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडिया उतरणार आहे. याचदरम्यान वेस्ट इंडिज वनडे मालिकादेखील खेळवली जाईल. त्यानंतर भारतीय संघ महत्त्वाच्या न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. पण यादरम्यान शुबमन गिलच्या जागी श्रेयस अय्यरला वनडे संघाचं नेृतत्त्व करावं लागणार आहे.

भारतीय संघाची आशियाई क्रीडा स्पर्धेनंतरची पुढील मोठी मालिका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, ज्यासाठी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय सामने (ODIs), पाच टी-२० सामने (T20Is) आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. मात्र, या दौऱ्याच्या वेळापत्रकामुळे अशा काही अडचणी निर्माण झाल्या आहेत की, भारतीय संघाला मालिकेदरम्यानच कर्णधार बदलावा लागू शकतो, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

भारतीय संघ ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात न्यूझीलंडचा दौरा करेल आणि २२ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. या मालिकेसाठी श्रेयस अय्यर संघाचं नेतृत्व करेल. त्यानंतर ४ नोव्हेंबरपासून पाच सामन्यांची एकदिवसीय (ODI) मालिका सुरू होईल, ज्यामध्ये शुबमन गिल कर्णधार असेल. मात्र, गिलला कदाचित ही मालिका अर्धवट सोडावी लागू शकते; त्यामुळे उपकर्णधार अय्यर कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकतो.

शुबमन गिलने एकदिवसीय मालिका मध्येच सोडण्यामागील कारण वैयक्तिक नसून ते दौऱ्याच्या वेळापत्रकाशी संबंधित आहे. एका वृत्तानुसार, न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय संघाच्या वेळापत्रकामुळे कर्णधार गिल आणि संघ व्यवस्थापनासमोर एक आव्हान निर्माण झालं आहे. याचं कारण म्हणजे एकदिवसीय (ODI) आणि कसोटी मालिका यांच्यात केवळ तीन दिवसांचं अंतर आहे; अंतिम एकदिवसीय सामना १५ नोव्हेंबरला होणार आहे, तर पहिली कसोटी १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

सध्या टीम इंडियामध्ये शुबमन गिल, जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांसारखे खेळाडू आहेत, ज्यांची दोन्ही प्रकारच्या (फॉर्मेट्सच्या) संघांमध्ये निवड निश्चित मानली जात आहे. परिणामी, त्यांना केवळ विश्रांतीचीच नव्हे, तर कसोटी सामन्यांसाठी सरावाचीही आवश्यकता असेल. मिळालेल्या माहितीनुसार, याच कारणामुळे गिलसह काही खेळाडू न्यूझीलंडमधील परिस्थितीनुसार ‘रेड-बॉल’चा सराव करण्यासाठी शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांतून (ODIs) विश्रांती घेऊ शकतात. यामुळे शेवटच्या दोन सामन्यांसाठी अय्यर एकदिवसीय संघाचं नेतृत्त्व करू शकतो.

गिलसह टीम इंडियाच्या कसोटीपटूंसाठी ही मालिका अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. कर्णधार गिलने कसोटी मालिकेपूर्वी पुरेसा तयारीचा वेळ मिळायला हवा, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. यात केवळ खेळाडूच नव्हे, तर कोचिंग स्टाफचीही विभागणी होणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर कसोटी संघासह असतील. त्यांच्याबरोबर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक सुभादीप, फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक किंवा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांपैकी एक जण असेल. दरम्यान, उर्वरित दोन सहाय्यक प्रशिक्षक मालिका संपेपर्यंत एकदिवसीय संघासह असतील.