Shreyas Iyer Record: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने पदार्पण केल्यामुळे हा सामना ऐतिहासिक ठरला. पण भारतीय संघाला विजयाची नोंद करता आलेली नाही. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी १९१ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा बचाव करताना भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सामना गमावताच भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली होती. पण श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यर सुरुवातीच्या ४ पैकी एकही सामना न जिंकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपासून भारतीय संघाच्या कर्मधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. पण या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारत – इंग्लंड टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारताचा पराभव
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेला वैभव सूर्यवंशी १४ धावांवर माघारी परतला. तर अभिषेक शर्माने ४३, इशान किशनने ४९ धावा केल्या. तर शेवटी तिलक वर्माने नाबाद २४ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १९० धावांवर पोहोचवली.
या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. दोन्ही सलामीवीर शून्यावर माघारी परतले होते. फिल सॉल्ट आणि जोस बटलर या दोघांनाही अर्शदीप सिंगने शून्यावर माघारी धाडलं. पण त्यानंतर हॅरी ब्रुकने ३९ धावांची खेळी केली. तर जेकब बेथेल शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने नाबाद ७६ धावांची खेळी करून इंग्लंडला हा सामना जिंकून दिला.
