Shreyas Iyer Angry Video: श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वाखाली खेळत असलेला भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.हा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू मँचेस्टरमध्ये दाखल झाले आहेत. बीसीसीआयच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भारतीय संघाचा डरहॅम ते मँचेस्टर प्रवासाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस अय्यरने दिलेली रिअॅक्शन सध्या तुफान चर्चेत आहे.

मालिकेतील दुसरा टी-२० सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे धुतला गेला होता. त्यामुळे दोन्ही संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यर भारतीय संघाला पहिला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे. आयर्लंडविरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. याआधी आयर्लंडविरूद्ध खेळताना कुठल्याही फॉरमॅटमध्ये खेळताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला नव्हता.

श्रेयस अय्यर भडकला?

ज्यावेळी भारतीय खेळाडू बसने मँचेस्टरला जात होते, त्यावेळी कॅमेरामनने बसमध्येच खेळाडूंचे रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद केले. प्रत्येकाने जसं जमेल तशी पोझ दिली. यादरम्यान गॉगल घालून हटके पोझ दिली. त्यानंतर प्रवासादरम्यान बस एका ठिकाणी थांबली, त्यावेळी खेळाडू खाण्यासाठी काहीतरी घ्यायला बसच्या बाहेर पडले. त्यावेळी कॅमेरामनने कॅमेरा श्रेयस अय्यर आणि तिलक वर्माकडे वळवला. त्यावेळी तिलकने श्रेयसच्या खांद्यावर हात ठेवला आणि श्रेयसकडे इशारा केला. पण कॅमेरा ज्यावेळी श्रेयस अय्यरकडे वळवला, त्यावेळी तो रागात असल्याचं दिसून आलं. त्याने दिलेल्या या रिअॅक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इंग्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.