Shreyas Iyer on Suryakumar Yadav Advice: भारताचा नवा टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेद्वारे इंग्लंड दौऱ्याला सुरुवात करणार आहे. आयर्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर दमदार पुनरागमन करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या मालिकेपूर्वी श्रेयस अय्यरला सूर्यकुमारने काही इनपूट्स देत सल्ले दिले होते, ज्याचा खुलासा श्रेयस अय्यरने आता केला आहे.

आयर्लंडविरूद्ध दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताला स्पष्टपणे विजेतेपदाचा दावेदार मानलं जात होतं. मात्र, सर्वांच्या अपेक्षांना धक्का देत आयर्लंडने भारताचा २-० असा धुव्वा उडवला. टी-२० कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची ती पहिलीच मालिका होती. आता बुधवारी चेस्टर-ले-स्ट्रीट येथील रिव्हरसाइड मैदानावर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारत विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. आयर्लंड मालिकेचा आढावा घेताना अय्यरने संघाला अपेक्षित सुरुवात करता आली नसल्याची कबुली दिली.

‘निर्भय आणि आक्रमक क्रिकेट खेळायचं आहे’ – श्रेयस अय्यर

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होत असताना श्रेयस अय्यरने संघाने निर्भय, आक्रमक आणि प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवणारे क्रिकेट खेळावं, अशी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “मैदानावर उतरल्यावर मला प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण करायचा असतो. माझा खेळ आक्रमक आणि निर्भय असावा, अशी माझी नेहमीच इच्छा असते. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडूनेही हाच दृष्टिकोन स्वीकारावा, जेणेकरून आमचं व्यक्तिमत्त्व आणि मैदानावरील वावर पाहून प्रतिस्पर्धी संघावर मानसिक दबाव निर्माण होईल.”

“माझ्यासाठी मैदानावरील प्रत्येक सामना हा युद्धासारखाच असतो. मला प्रत्येक सामना जिंकायचा असतो आणि भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूमध्येही हाच विजयी आणि लढाऊ दृष्टिकोन रुजावा, तसेच प्रतिस्पर्ध्यांना प्रत्येक क्षणी कडवी झुंज द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे,” असं अय्यर म्हणाला.

“गौतम गंभीर (गौती भाई) यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की, आपण विश्वविजेते होतो. पण आता एक नवं पर्व सुरू होत आहे. आता मी संघाचा कर्णधार आहे आणि आम्ही पुन्हा शून्यापासून सुरुवात करत आहोत,” असं अय्यर म्हणाला. यावेळी अय्यरने रोहित शर्मा आणि भारताचा माजी टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाबाबतही भाष्य केलं.

रोहित-सूर्याबद्दल श्रेयस अय्यर काय म्हणाला?

रोहित शर्माबद्दल बोलताना अय्यर म्हणाला, “रोहित शर्मासोबत बोलताना मोठ्या भावासोबत गप्पा मारत असल्यासारखं वाटतं. त्याने माझ्या देशांतर्गत कारकिर्दीतही मला खूप मदत केली आहे. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणं माझ्यासाठी नेहमीच सहज आणि सोपं राहिलं आहे.”

“सूर्या (सूर्यकुमार यादव)चाही स्वभाव तसाच आहे. आम्ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये बराच काळ एकत्र खेळलो आहोत. इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वी त्याने मला संघ व्यवस्थापनाची कार्यपद्धती, विविध परिस्थितींमध्ये खेळाडूंचा दृष्टिकोन आणि संघातील वातावरणाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्याच्याशी खूप चांगला संवाद झाला आणि त्याच्याकडून शिकण्यासारखंही बरंच काही मिळालं,” असं अय्यर म्हणाला.