Shreyas Iyer Cricket Journey from dropped to T20I Captain: श्रेयस अय्यर काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अचंबित करणाऱ्या झेलसाठी चर्चेत आहे. अशक्यप्राय वाटणारा झेल त्याने प्रत्यक्षात साकारला. पंजाबचा कर्णधार श्रेयसची बॅटही तळपते आहे. आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची बोली लागलेला श्रेयस हा टी२० प्रकारातील चलनी नाणं आहे. त्याची ब्रँडव्हॅल्यू दिवसागणिक वाढते आहे. मात्र श्रेयसचा हा प्रवास रोलरकोस्टर राईडला शोभेल असा आहे. शनिवारी निवडसमितीने श्रेयसची भारतीय टी२० संघाचा कर्णधार म्हणून निवड केली आणि एक वर्तुळ पूर्ण झालं.

२०२४ मध्ये रणजी करंडक स्पर्धेचा सामना न खेळल्याचं कारण झालं आणि श्रेयसला वार्षिक करार यादीतून डच्चू देण्यात आला. वार्षिक करार यादीतून बाजूला करण्यात येणं म्हणजे भारतीय संघाच्या निवडीसाठी विचार न होणं. आर्थिक नुकसान हा मुद्दा होताच पण स्कीम ऑफ थिंग्ज अर्थात निवडसमितीच्या योजनांमध्ये नसल्याचंही ते द्योतक होतं. श्रेयसने आपल्या बॅटने आणि नेतृत्वाने याला उत्तर दिलं. त्यापुढचं दीड वर्ष श्रेयससाठी स्वप्नवत असं राहिलं आहे. श्रेयसकडे नेतृत्व असलेला संघ विजयपथावर राहिला आहे. त्याची बॅटही तळपते आहे. जाणून घ्या या प्रवासाविषयी

फेब्रुवारी २०२४- बीसीसीआय वार्षिक करार यादीतून डच्चू

श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना बीसीसीआयतर्फे वार्षिक करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून डच्चू देण्यात आला. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या निर्देशानुसार खेळाडूंनी राष्ट्रीय संघासाठी खेळण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं. आयपीएलसाठी राष्ट्रीय संघ तसंच डोमेस्टिक संघासाठी खेळणं बाजूला सारू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. रणजी करंडक स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये मुंबई आणि बडोदा संघ आमनेसामने होते. मात्र पाठीचं दुखण्याच्या कारणास्तव श्रेयस या लढतीत खेळला नाही. दरम्यान बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीतील स्पोर्ट्स सायन्स आणि मेडिसीनचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसचा दावा फेटाळला होता. श्रेयस फिट असून खेळण्यासाठी उपलब्ध आहे असं पटेल यांनी स्पष्ट केलं होतं. श्रेयसचं म्हणणं आणि नितीन पटेल यांचं वक्तव्य यामध्ये फारकत दिसून आली. याचा फटका श्रेयसला बसला.

मे २०२४- श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने पटकावलं जेतेपद

२०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने १२.२५ कोटी रुपये खर्चून श्रेयसला ताफ्यात समाविष्ट केलं. पण २०२३ हंगामात दुखापतीमुळे श्रेयस खेळू शकला नाही. श्रेयसच्या अनुपस्थितीत नितीश राणाने संघाचं नेतृत्व केलं. २०२४ मध्ये फिट होऊन परतलेल्या श्रेयसने नेतृत्वगुणांची झलक सादर केली. श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने जेतेपदावर नाव कोरलं. तब्बल दशकभरानंतर कोलकाताने जेतेपदावर कब्जा केला. श्रेयसने ३७ची सरासरी आणि १४६च्या स्ट्राईकरेटने ३५१ धावा करत संघासमोर कामगिरीचा वस्तुपाठच सादर केला.

ऑक्टोबर २०२४- फर्स्टक्लास शतकांचा दुष्काळ संपवला

रणजी करंडक स्पर्धेत श्रेयसने महाराष्ट्राविरुद्ध शतकी खेळी साकारली. यासह त्याने तीन वर्षांचा फर्स्टक्लास शतकांचा दुष्काळ संपवला. त्याने १९० चेंडूत १४२ धावांची खणखणीत खेळी केली. याआधी त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावलं होतं.

ऑक्टोबर २०२४- कोलकाताशी ऋणानुबंध तुटला

ज्या कर्णधाराच्या नेतृत्वात आयपीएल जेतेपद पटकावलं त्यालाच रिटेन करण्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अपयश आलं. कोलकाता संघाने रिटेन केलेल्या सहा खेळाडूंची यादी जाहीर केली मात्र त्यात श्रेयसच्या नावाचा समावेश नव्हता. श्रेयसला रिटेन करण्यासाठी उत्सुक असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी सांगितलं. मात्र मार्केटव्हॅल्यू नेमकी किती आहे हे जाणून घेण्यासाठी लिलावात जाऊ इच्छितो अशी श्रेयसची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. आयपीएल जेतेपद पटकावून देऊनही कर्णधार बाजूला झाल्याचं पाहायला मिळालं. २०२५ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कोलकाताने श्रेयससाठी बोली लावली मात्र १० कोटींच्या पलीकडे जाताच त्यांनी माघार घेतली. श्रेयससाठी लखनौ तसंच पंजाब संघ आतूर होते. अखेर पंजाबने २६.७५ कोटी रुपये मोजून श्रेयसला ताफ्यात समाविष्ट केलं. आयपीएल इतिहासातला दुसरी सगळ्यात मोठी बोली लागलेला खेळाडू ठरला.

नोव्हेंबर २०२४- रणजी स्पर्धेत द्विशतक

रणजी करंडक स्पर्धेत श्रेयसने ओडिशाविरुद्ध २२८ चेंडूत २३३ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. श्रेयसचं हे तिसरं द्विशतक आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच त्याने द्विशतकाला गवसणी घातली. त्यावेळी त्याने पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना द्विशतक झळकावलं होतं. बॉर्डर गावस्कर मालिकेसाठी श्रेयसची भारतीय संघात निवड झाली नाही.

डिसेंबर २०२४- नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं जेतेपद

मिडास टच सिद्ध करत श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. श्रेयसने १८८च्या स्ट्राईकरेटने ३४५ धावा करत संघासमोर आदर्श ठेवला. यामध्ये एक शतकाचाही समावेश होता. या स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याची मुंबईची ही दुसरीच वेळ होती.

फेब्रुवारी २०२५- दिमाखात आंतरराष्ट्रीय पुनरागमन

सहा महिन्यानंतर श्रेयसचं भारतीय संघात पुनरागमन झालं. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली. विराट कोहलीला दुखापत झाल्याने श्रेयसचा खेळण्याचा मार्ग सुकर झाला. ५९, ४४, ७८ अशा खेळींसह श्रेयसने निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं.

मार्च २०२५- चॅम्पियन्स कामगिरी

भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. या स्पर्धेत १५,५६, ७९, ४५, ४८ अशा खेळींसह श्रेयसने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

एप्रिल २०२५- बीसीसीआय वार्षिक करार सूचीत नाव समाविष्ट

वर्षभरापूर्वी ज्या यादीतून डच्चू मिळाला त्याच यादीत श्रेयसचं नाव समाविष्ट करण्यात आलं. ब श्रेणीत श्रेयसचा समावेश करण्यात आला. बीसीसीआयने एकूण ३४ खेळाडूंना करारबद्ध केलं. यादीत समाविष्ट होण्यासाठी सगळे निकष श्रेयसने पूर्ण केले होते.

जून २०२५- श्रेयसच्या नेतृत्वात पंजाबची अंतिम फेरीत धडक

श्रेयसच्या नेतृत्वात पंजाब किंग्ज संघाने आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांना नमवलं. तीन आयपीएल फायनलमध्ये धडक मारून देणारा तो केवळ तिसरा कर्णधार ठरला. याआधी अशी कामगिरी रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी केली होती. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्ली, कोलकाता आणि पंजाबने अंतिम फेरीत धडक मारली. श्रेयसने ५०.३३च्या सरासरीने ६०४ धावा केल्या.

जून २०२५- भारताच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत

बॅटसह दमदार कामगिरी आणि सक्षम नेतृत्व यामुळे श्रेयस भारताचा संभाव्य कर्णधार असू शकतो असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं होतं. मात्र निवडसमितीने शुबमन गिलची टेस्ट आणि वनडे कर्णधारपदासाठी निवड केली. रोहित शर्माने टी२० प्रकारातून निवृत्ती घेतल्यामुळे श्रेयसचं नाव चर्चेत होतं. मात्र सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं.

ऑगस्ट २०२५- आशिया चषकासाठी संघात निवड नाही

आशिया चषकासाठी श्रेयसची भारतीय संघात निवड न झाल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाच्या मााध्यमातून नाराजी व्यक्त केली. निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी श्रेयसची निवड न होण्यामागची भूमिका सांगितली. निवड न होण्यात त्याचा काहीही दोष नाही. आमचाही नाही. त्याची कामगिरी पुरेशी बोलकी आहे. पण त्याला संधीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. श्रेयससाठी कोणाला वगळायचं असा प्रश्न आहे. १५ जणांचीच निवड होऊ शकते. श्रेयसची रिझर्व्ह अर्थात राखीव खेळाडूंमध्येही निवड झाली नाही.

ऑक्टोबर २०२५- ऑस्ट्रेलियात क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी वनडेत क्षेत्ररक्षण करताना श्रेयसच्या पोट आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. काही दिवस तो आयसीयूत होता. प्रकृती स्थिर झाल्यानंतरही तो काही दिवस ऑस्ट्रेलियात होता. तब्बल तीन महिन्यांच्या खडतर रिहॅब प्रक्रियेनंतर श्रेयसने पुनरागमन केलं.

फेब्रुवारी मार्च २०२६- टी२० वर्ल्डकप संघात स्थान नाही

नावावर चांगली कामगिरी असूनही श्रेयसची मायदेशात झालेल्या टी२० वर्ल्डकपसाठी संघात निवड होऊ शकली नाही. निवडसमितीने श्रेयस अय्यरऐवजी तिलक वर्माच्या नावाला पसंती दिली.