Who Will be India’s Next T20I Captain: भारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. आयपीएल २०२६ मधील खराब कामगिरी आणि सातत्याने खालावत असलेल्या फलंदाजी स्तरामुळे सूर्यकुमार यादवकडून आता टी-२० कर्णधारपद काढून घेण्यात आलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, सूर्याला केवळ कर्णधारपदावरूनच नव्हे, तर भारतीय संघातून खेळाडू म्हणूनही मुक्त करण्यात आलं आहे. आता प्रश्न असा आहे की, सूर्यानंतर भारतीय संघाचा पुढचा टी-२० कर्णधार कोण असेल? अनेक वृत्तांनुसार, एक खेळाडू या शर्यतीत आघाडीवर आहे.
गेल्या २ वर्षांपासून सूर्यानच्या क्षमतेनुसार त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या. टी-२० विश्वचषकातील १-२ खेळी वगळता आणि त्यानंतर आयपीएल २०२६ मधील अखेरच्या सामन्यातील अर्धशतक वगळलं तर त्याचा फॉर्म सातत्याने खऱाब राहिला. यानंतर आता सुरू असलेल्या मुंबई टी-२० लीगमध्येही सूर्याची खराब कामगिरी कायम राहिली आहे. त्यामुळे त्याच्या फलंदाज म्हणून फॉर्मचा विचार करता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
कर्णधारपदाच्या शर्यतीत कोणता खेळाडू आघाडीवर?
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, टी-२० संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत श्रेयस अय्यर आघाडीवर आहे. दरम्यान, आयएएनएसच्या वृत्तानुसार, भारतीय संघात फक्त एकच जागा रिक्त असेल आणि ती म्हणजे चौथ्या क्रमांकाची जागा. श्रेयस त्या जागेसाठी अगदी योग्य पर्याय आहे, म्हणजेच तो या शर्यतीत आघाडीवर आहे. मागील वृत्तांमध्येही श्रेयस अय्यरचं नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं आहे. संजू सॅमसन आणि इशान किशन यांची नावेही समोर आली असली तरी, सध्या सूर्यानंतर संघाचे नेतृत्व करण्यासाठी श्रेयस अय्यर हा संभाव्य उमेदवार आहे.
खरं तर, निवड समिती आणि व्यवस्थापनाने तिलक वर्माच्या नावावरही चर्चा केल्याचं वृत्त समोर आलं आहे. तिलक कदाचित कर्णधार होणार नसला तरी, तो उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. अक्षर पटेल उपकर्णधारपद गमावू शकतो. आयपीएलनंतर, तिलक एकदिवसीय तिरंगी मालिकेत भारत ‘अ’ संघाचेही नेतृत्त्व करणार आहे.
सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढून घेण्यामागे आयपीएल २०२६ मधील त्याचा खराब फॉर्म हे प्रमुख कारण होतं. असंही वृत्त आहे की, निवड समिती आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर त्याला इंग्लंड दौऱ्यापर्यंत संधी देऊ इच्छित होते. पण, भविष्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
