Shreyas Iyer Sister Trolls KKR: आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील १२ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघामध्ये होणार होता. नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ३.४ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. दरम्यान सामना रद्द झाल्यानंतर श्रेयस अय्यरची श्रेष्ठा अय्यरची एक इंस्टाग्राम पोस्ट तुफान चर्चेत आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना रद्द होणार, असा अंदाज आधीपासूनच वर्तवण्यात आला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, इडन गार्डन्सच्या मैदानावर होणारा पुढील सामना देखील पावसामुळे रद्द होऊ शकतो. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या हंगामातही याच मैदानावर झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्या सामन्यात पंजाब किंग्जने पहिल्या डावात फलंदाजी करताना २०१ धावांचा डोंगर उभारला होता. ज्यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघाची फलंदाजी सुरू झाली, त्यावेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता.
श्रेयस अय्यरच्या बहिणीने केकेआरची घेतली फिरकी
यावेळी ३.४ षटकांचा खेळ होताच सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला. पंजाब किंग्जने सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला एकही सामना जिंकता आला नव्हता. हा सामना रद्द झाल्याने १ गुण मिळाला, त्यामुळे गुणतालिकेत खातं उघडलं आहे.
या सामन्यानंतर श्रेष्ठा अय्यरने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती भांगडा डान्स करताना दिसून येत आहे. तिने कोलकाता नाईट रायडर्स संघाची फिरकी घेतली आहे. या व्हिडिओमध्ये ती, ‘पंजाबी लोकांचं मन मोठं असतं, दिला तुम्हाला एक पॉईंट…’ असं म्हणताना दिसून येत आहे. यासह भांगडा डान्स देखील करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
