Shreyas Iyer Sister Shrestha Iyer on Trollers Video: आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. पंजाब स्पर्धेबाहेर झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या बहिणीचा जुना व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. केकेआर आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर तिने एक पॉईंट संघाला दान दिल्याचा व्हीडिओ केला होता. पण या व्हीडिओमुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं आणि आता तिने या सर्व प्रकरणावर मौन सोडलं आहे.

श्रेष्ठा अय्यरने पंजाब किंग्स व केकेआर यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर एक व्हीडिओ केला होता. ती काही पंजाब किंग्सच्या फॅन्ससोबत या व्हीडिओ मध्ये होती. दोन्ही संघांमधील सामना मुसळधार पावसामुळे रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर लगेचच, श्रेष्ठाने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये ती आणि पंजाबचे चाहते केकेआरसाठी “दान” म्हणून दिलेल्या एका गुणाची खिल्ली उडवत नाचताना दिसत होते. यामुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. याला प्रत्युत्तर म्हणून, श्रेष्ठा अय्यरने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारे स्वतःचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत.

सतत ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर, श्रेष्ठा अय्यरने आता सोशल मीडियावर व्हीडिओच्या माध्यमातून सगळं सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये तिने ट्रोलर्सवर आपला राग व्यक्त केला आहे. व्हिडिओमध्ये श्रेष्ठाने स्पष्टपणे म्हटलं आहे, “लोक म्हणत आहेत, ‘आता तुझ्याकडे बोलायला काहीच नाही का?’ माझ्याकडे खूप काही आहे. मी जो व्हीडिओ तयार केला होता. जो एक फनी व्हीडिओ होता. तुम्ही त्या एवढ्याश्या व्हीडिओचं एवढं मोठं प्रकरण केलंत. त्या व्हीडिओमागे कोणता वाईट हेतू नव्हता. मी फक्त माझ्या भावाच्या संघाला पाठिंबा देत होतो. याचा अर्थ असा नाही की मी कोणत्याही संघाचा किंवा खेळाडूचा द्वेष करते. मी सर्व खेळाडूंचा आदर करते कारण माझा भाऊसुद्धा एक क्रिकेटपटू आहे.”

हा मुद्दा केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नव्हता, ट्रोलर्सनी श्रेष्ठाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनालाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली. श्रेष्ठाने आपला अनुभव सांगताना म्हटले, “मला तुमच्याबद्दल वाईट वाटतंय. तुम्ही माझ्या कामाच्या ठिकाणी फोन करून मला, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करत आहात. तुम्ही कोणत्याही वेळी फोन करून त्यांचा छळ करत आहात. तुम्हाला माझा द्वेष करायचा असेल तर खुशाल करा, पण माझ्याशी संबंधित निरपराध लोकांना त्रास देणं थांबवा. माझा भाऊ जिंकला किंवा हरला तरी, मी त्याला नेहमीच पाठिंबा देईन आणि त्याच्या आनंदात सहभागी होईन.”

श्रेष्ठा अय्यर पुढे म्हणाली, “जेव्हा कधी एखाद्या क्रिकेटपटूचा संघ हरतो, तेव्हा तुम्ही त्याच्या कुटुंबीयांना दोष देता. चाहते संघाच्या पराभवासाठी खेळाडूंच्या पत्नींना किंवा बहिणींना दोष देतात. जिंकणं किंवा हरणं हा खेळाचाच एक भाग आहे आणि जेव्हा कधी माझा भाऊ जिंकेल, तेव्हा मी आनंद साजरा करणार.”