PBKS vs RCB, IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धा ही पंजाब किंग्स संघासाठी वाईट स्वप्नाहून कमी राहिलेली नाही. स्पर्धेतील सुरुवातीच्या सलग ६ सामन्यांमध्ये पंजाबने विजयाची नोंद केली होती. त्यानंतर पुढील सलग ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आधी पंजाबला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासह टॉप २ मध्ये राहण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण आता टॉप ४ मध्ये प्रवेश करणंही कठीण झालं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सला विजयासाठी २२३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबला २३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.

सामना झाल्यानंतर श्रेयस अय्यरला विचारण्यात आलं की, पंजाबने हा सामना कुठे गमावला? याबाबत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, “त्यांनी दमदार सुरुवात केली आणि पावरप्ले झाल्यानंतर आमच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली. २२२ धावा करणं ही कौतुकास्पद कामगिरी होती. आम्ही गोलंदाजी करताना विकेट्स घेण्यात अपयशी ठरलो. मला तरी हेच वाटतं, की पावरप्लेमध्येच सामना हातून निसटला होता.”

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला चांगल्या सुरुवातीची गरज होती, पण पंजाबचे फलंदाज हवी तशी सुरुवात करुन देऊ शकले नाहीत. सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले. याबाबत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला की, “आमचे ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतले. प्रभसिमरन सिंग आणि प्रियांशने आमच्या संघाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. ही जोडी आम्हाला पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात करुन देत होती. पण या सामन्यात आम्ही तशी सुरुवात करु शकलो नाही. मी सुद्धा लवकर आऊट झालो, हे खूप निराशाजनक होतं.”

यासह श्रेयस अय्यरने भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. श्रेयस म्हणाला, “भुवी आणि हेझलवूड या जोडीने जबरदस्त गोलंदाजी केली.”, पंजाबचा साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्याबद्दल बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “नक्कीच, निकाल काहीही लागो, मी नेहमीच सकारात्मक राहतो. यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वात कोणताही फरक पडत नाही, मी नेहमी दृढनिश्चयाने पुढे वाटचाल करतो. मी भूतकाळात फारसा रमत नाही. तो काळ उलटून गेला आहे, सर्व काही संपले आहे. प्रत्येक अडचणीनंतर आशेचा एक नवा किरण नक्कीच असतो.”