Shreyas Iyer Statement: भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात १८२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाला टी-२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडविरूद्ध मालिका गमवावी लागली आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलताना कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.
भारताला आयसीसी टी-२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून, श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण श्रेयस अय्यर सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. श्रेयस अय्यर हा भारताच्या टी-२० इतिहासात कर्णधार बनताच लागोपाठ २ सामने गमावणारा दुसराच कर्णधार ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड ऋषभ पंतच्या नावावर होता.
सामन्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “खरं सांगायचं झालं, तर ही आमच्यासाठी नक्कीच चांगली मालिका नव्हती. पण आयर्लंडच्या संघाला दाद द्यावी लागेल, त्यांनी दमदार खेळ केला. येथील खेळपट्टी कशी असणार, याची त्यांना आधीपासून कल्पना होती. त्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. त्यामुळे हा त्यांचा एक मोठा आणि सर्वसमावेशक विजय आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आमच्या गोलंदाजांनी ठरल्याप्रमाणे अप्रतिम गोलंदाजी केली. पण आम्ही फलंदाजीत थोडे कमी पडलो. खेळपट्टी कशी खेळणार याचा अंदाज लावण्यात आणि एकेरी धावांचं दुहेरी धावांत रुपांतर करण्यात आम्ही अपयशी ठरलो. मला वाटतं या विभागात त्यांनी आमच्यावर पूर्णपणे मात केली.”
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या आयर्लंडने २० षटकांअखेर अवघ्या १५४ धावा केल्या होत्या. १५५ धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोघेही शून्यावर बाद झाले. त्यानंतर इशान किशन १२ धावांवर धावबाद झाला. तर श्रेयस अय्यर अवघ्या १० धावांवर बाद झाला. तिलक वर्माने ५५ धावांची खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. शिवम दुबेने २० धावा केल्या. तर हर्षित राणाने २१ धावांचे योगदान दिले. भारताने हा सामना एका धावेने गमावला.
