Shreyas Iyer Statement: पंजाब किंग्स संघासाठी आयपीएल २०२६ ही स्पर्धा रोलर कोस्टर राईडपेक्षा कमी राहिलेली नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वाखाली खेळत असलेल्या पंजाबने स्पर्धेतील सुरुवातीच्या ६ सामन्यांमध्ये लागोपाठ विजय मिळवला होता. पण आता गेल्या ५ सामन्यांमध्ये पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात पंजाबने विजयासाठी २०१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने ६ गडी राखून विजयाची नोंद केली. दरम्यान हा सामना गमावल्यानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.

सामना झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “खरं सांगायचं तर हा पराभव पचवणं खूप कठीण आहे. पण मला कोणत्याही एका गोष्टीवर बोट ठेवायचं नाही, कारण सामना उत्तम झाला. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. तिलक वर्माने अविश्वसनीय फलंदाजी केली. त्याने गॅप शोधून काढले आणि फटके मारले. त्याचं श्रेय त्याला द्यावच लागेल.”

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना अझमतुल्लाने शानदार फलंदाजी केली. पराभवानंतर श्रेयसने अझमतुल्लाच्या फलंदाजीचं कौतुक केलं. तो म्हणाला, “एका टप्प्यावर आम्हाला वाटलं होतं की, आम्ही १७०-१८० धावांपर्यंत पोहोचू. पण त्यानंतर अझमतुल्लाहने सामना फिरवला. त्याने मारलेले ते स्कूप सिक्स आणि १६-१७ व्या षटकानंतर आम्हाला मिळालेला वेग वाखाणण्याजोगा होता. संघाला २०० धावापर्यंत पोहोचवणं ही त्याची कौतुकास्पद कामगिरी होती.”

मुंबईचा दमदार विजय

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंगने ५७ धावांची खेळी केली. तर अझमतुल्लाह ओमरजईने ३८ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. पंजाबने २० षटकांअखेर ८ गडी बाद २०० धावा केल्या. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईकडून तिलक वर्मा शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने नाबाद ७५ धावांची खेळी केली. त्याला विल जॅक्सची साथ मिळाली. ज्याने नाबाद २५ धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या रायन रिकल्टने ४८ धावा केल्या. हा सामना मुंबईने ६ गडी राखून आपल्या नावावर केला.