Shreyas Iyer Statement India defeat vs Ireland: टी-२० मधील वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघाला आयर्लंड संघाने पराभवाचा धक्का दिला आहे. आयर्लंडने घरच्या मैदानावर भारतीय संघाचा तब्बल ३४ धावांनी पराभव केला. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंड संघाने भारताला पराभूत केलं आहे. नवा टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारताचा हा पहिलाच सामना होता आणि पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घेऊया.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आणि संघाने सुरूवात चांगली केली, पण आयर्लंडचा नवा कर्णधार लॉर्कन टकर व गॅरेथ डलानी यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला तब्बल १८२ धावांपर्यंत नेलं. प्रत्युत्तरात अभिषेक शर्माने २० चेंडूत अर्धशतक करत संघाला चांगली सुरूवात करून दिली, पण याशिवाय भारताचे सर्व फलंदाज आयरिश गोलंदाजीसमोर फेल ठरले.

आयर्लंडचे मुख्य ६ खेळाडू या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त होते. त्यामुळे या सामन्यात २ नव्या गोलंदाजांना पदार्पणाची संधी मिळाली, याशिवाय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देखील नवा कर्णधार लॉर्कन टकरच्या खांद्यावर होती. याशिवाय भारतीय वंशाच्या जय मुंद्रा याने झटपट २ विकेट्स घेत भारताला धक्के देण्यास सुरूवात केली. यानंतर पदार्पणवीर मॅथ्यू हॉलर्डने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय मॅथ्यू हम्फ्रीस यानेही ३ विकेट्स घेतल्या. तर मॅकार्थी व डिलानी यांनी १-१ विकेट्स घेतल्या.

कर्णधार श्रेयस अय्यर भारताच्या पराभवानंतर काय म्हणाला?

भारताच्या गोलंदाजीबद्दल आणि सामन्याच्या उत्तरार्धात सामना हातातून निसटल्याबद्दल श्रेयस अय्यर म्हणाला, “सुरुवातीला आमच्या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्यांना स्विंग आणि सीम मूव्हमेंटची चांगली साथ मिळाली आणि त्यांनी सुरुवातीलाच दोन महत्त्वाचे बळीही घेतले. त्यामुळे आम्हाला उत्कृष्ट सुरुवात मिळाली होती. मात्र, मधल्या षटकांमध्ये आमच्या एक्झिक्युशनमध्ये त्रुटी राहिल्या. आम्ही फलंदाजांना सरळ मैदानाच्या दिशेने फटके खेळण्याची संधी दिली, जिथे सीमारेषा तुलनेने लहान आहेत, हे आम्हाला माहीत होतं.

तरीही, जेव्हा डाव सावरण्याची वेळ आली, तेव्हा आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. सुरुवात पाहता १४० धावांचं लक्ष्य बचावासाठी पुरेसं ठरलं असतं, असं मला वाटलं होतं. पण तरीही या सामन्यातून आम्हाला खूप चांगला अनुभव मिळाला. या परिस्थितीत खेळण्याची संधी मिळाली, खेळपट्टीचा चांगला अंदाज आला आणि कर्णधार म्हणून माझी सुरुवातही समाधानकारक वाटते.”

“या सामन्यात जे घडलं ते आता विसरून पुढे जायचं आहे. या पराभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पुढील सामन्यात आम्ही पूर्ण ताकदीने आणि नव्या आत्मविश्वासाने मैदानात उतरू,” असं कॅप्टन म्हणाला.

हर्षित राणा आणि शिवम दुबे यांच्या गोलंदाजीबद्दल श्रेयस म्हणाला, “नक्कीच, दोघांनीही चांगली कामगिरी केली. सुरुवातीला त्यांना खेळपट्टीची चांगली साथ मिळाली. शिवमने यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या षटकांमध्ये गोलंदाजी केली आहे. त्यामुळे माझा त्याच्यावर नेहमीच विश्वास असतो. मी त्याच्यासोबत देशांतर्गत क्रिकेटही खेळलो आहे, त्यामुळे त्याच्या ताकदी आणि मर्यादा मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. हर्षित राणाने तर अप्रतिम गोलंदाजी केली. दुखापतीतून पुनरागमन करून अशाप्रकारे कामगिरी करणं आणि आपली गुणवत्ता सिद्ध करणं, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.”

श्रेयस अय्यरने पराभवानंतर टीम इंडियाला सुनावलं

पराभवानंतर संघाला मेसेज देताना श्रेयस अय्यर म्हणाला, “क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट गृहीत धरू शकत नाही. मैदानात उतरल्याबरोबर सामना जिंकता येत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येक क्षणी सामन्यात कायम राहावं लागतं. मी आधीही सांगितल्याप्रमाणे, वर्तमानात राहणं महत्त्वाचं आहे. प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणण्याची संधी मिळाली, तर त्याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. कोणत्याही क्षणाला किंवा परिस्थितीला हलक्यात घेऊ नये.”