Shreyas Iyer Statement: पंजाब किंग्जने संघाने पुन्हा एकदा दमदार विजयाची नोंद केली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने १९५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंगने दमदार अर्धशतकं झळकावली आणि पंजाबला एकतर्फी विजयाची नोंद करून दिली. दरम्यान या विजयानंतर बोलताना कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.

सामना झाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला, “इथून पुढे होणाऱ्या सामन्यांसाठी आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि सकारात्मक आहोत. आम्ही ज्या पद्धतीचा खेळ केला आहे ते उल्लेखनीय आहे. आम्हाला चांगलं माहीत आहे, आम्ही जो सामना खेळण्यासाठी मैदानात उतरू, तो एक संघ म्हणून आमच्यासाठी अतिशय महत्वाचा असेल. एकंदरीत ही एक सांघिक कामगिरी आहे. मोठा विजय मिळवण्याचा मला आनंद होतोय.”

तसेच प्रभसिमरन सिंगचं कौतुक करताना तो म्हणाला, “मला तरी वाटतं त्याने आपल्या खेळाचा दर्जा उंचावला आहे. गेल्या हंगामात जर तुम्ही पाहिलं, तर तो जायचा आणि पावरप्लेमध्ये बॅट फिरवायचा. तो धावा करत होता आणि आम्हाला चांगली सुरुवात देखील करून देत होता. पण यावेळी तो सामना संपवण्यासाठी योगदान देत आहे. युवा खेळाडू सामना जिंकून देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.”

तसेच पंजाब किंग्ज संघाच्या यशाचं गुपित काय? याबाबत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “मला वैयक्तिकरीत्या हेच वाटतं की, प्रत्येक सामन्यात आपण आणखी काहीतरी चांगलं करायला हवं. विरोधी संघावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, स्वतःला चॅलेंज करायला हवं की मी आणखी काय चांगलं करू शकतो. आम्ही हेच करतोय, हाच फॉर्म्युला आहे जो आम्ही फॉलो करतोय. जोपर्यंत आम्ही हे फॉलो करत राहू तोपर्यंत आम्हाला यश मिळत राहील. मला खूप आनंद होतोय.”

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १९५ धावा केल्या. मुंबईकडून क्विंटन डीकॉकने दमदार शतकी खेळी केली. तर नमन धीरने अर्धशतक झळकावलं. इतर कुठल्याही फलंदाजाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबकडून श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंगने दमदार अर्धशतकं झळकावली आणि पंजाबला एकतर्फी विजय मिळवून दिला.