हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात सण सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना हैदराबादच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. हेनेरिक क्लासेन आणि इशान किशनच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर हैदराबादने २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून कुपर कॉनोलीने शतकी खेळी केली. पण पंजाबचा संघ विजयापासून ३३ धावा दूर राहिला. दरम्यान लागोपाठ तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.

पंजाब किंग्सचा संघ आतापर्यंत अव्वल स्थानी होता. पण लागोपाठ ३ सामने गमावल्यानंतर पंजाबला आपलं नंबर १ स्थान गमवावं लागलं आहे. दरम्यान या पराभवानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “हे जरा जास्त झालं. आम्ही सुरुवातीलाच खूप झेल सोडले. सामना जसा पुढे गेला तशी खेळपट्टी स्लो होत गेली. सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूंनी उत्तम खेळ केला. त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की, सामना कसा जिंकला जातो. आमची या स्पर्धेतील सुरुवात एखाद्या स्वप्नासारखी होती. आम्ही मजबूत स्थितीत होतो. पण असंच खेळत राहिलो, तर यात आमचा काहीच फायदा नाही.”

पंजाबचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलने अनेकदा विकेटची संधी निर्माण करून दिली होती. पण त्याला क्षेत्ररक्षकांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. याबाबत बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “चहलने निडर होऊन गोलंदाजी केली. मी त्याला आधीच सांगितलं होतं की, तू आक्रमक गोलंदाजी कर. प्रामुख्याने तेव्हा, जेव्हा नवीन फलंदाज खेळपट्टीवर असेल. पण आमचं नशीब फुटकं.. आम्ही झेल पकडू शकलो नाही.”

या सामन्यात हैदराबादचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ५५ धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्माने ताबडतोड ३५ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर हैदराबादने २० षटकांअखेर ४ गडी बाद २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबकडून कुपर कॉनोलीने नाबाद १०७ धावांची खेळी केली. पण त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. पंजाबचा संघ विजयापासून ३३ धावा दूर राहिला.