Shreyas Iyer Statement: भारतीय संघाने पाचव्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी १९२ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. टीम सेफर्टच्या ९३ आणि ग्लेन फिलिप्सच्या नाबाद ६५ धावांच्या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने हे आव्हान सहज पूर्ण करून ७ गडी राखून विजय मिळवला. हा न्यूझीलंडचा लागोपाठ दुसरा विजय आहे. पण भारताने ही मालिका ३-२ ने आपल्या नावावर केली. दरम्यान हा सामना गमावल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.

सामना झाल्यानंतर बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “सामना खूप अटीतटीचा झाला. मधल्या षटकांमध्ये आम्हाला ज्या प्रकारची सुरूवात मिळाली होती, ते पाहता आम्ही याहून जास्त धावसंख्या उभारू शकलो असतो. पण त्यानंतर आम्ही लागोपाठ विकेट्स गमावल्या. फलंदाजीसाठी खेळपट्टी मुळीच सोपी नव्हती. हार्ड लेंथवरून चेंडूचा सामना करणं आव्हानात्मक होतं.” भारतीय संघाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. पण त्यानंतर भारतीय संघाने मधल्या षटकांमध्ये दमदार पुनरागमन केलं होतं. पण शेवटी विकेट्स गमावल्याने भारताला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही.

तसेच तो पुढे म्हणाला, “मला वाटलं होतं १९१ धावा पुरेशा असतील. पण आम्ही गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात बऱ्याच चुका केल्या. पण या चुकांमधून आम्हाला शिकायला मिळालं. सुरूवातीचे ३ सामने जिंकून आम्ही मालिका जिंकली होती. त्यामुळे उर्वरीत २ सामन्यांमध्ये आम्हाला नवीन प्रयोग करून पाहण्याची संधी होती.”

न्यूझीलंडचा दमदार विजय

या सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी १९२ धावांची गरज होती. धावांचा पाठलाग करताना फिन अॅलेन अवघ्या २ धावांवर माघारी परतला. त्यानंतर सेफर्ट आणि मिचेलने मिळून न्यूझीलंडचा डाव सावरला. मिचेलने २९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि सेफर्टने मिळून भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. ग्लेन फिलिप्स ६५ धावांवर नाबाद राहिला. तर सेफर्चने ९३ धावांची खेळी केली. न्यूझीलंडने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.