Shreyas Iyer Statement India vs West Indies T20 Series Draw: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. अखेरचा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. बंगळुरूमधील पावसामुळे सामना ९-९ षटकांचा खेळण्याचं निश्चित करण्यात आलं. भारताने ७.४ षटकांत ५ बाद ११८ धावांचा डोंगर उभारला. पण यानंतर पुन्हा पावसाला सुरूवात होत सामना थांबला आणि जोरदार सर आल्याने अखेरीस पंचांनी सामना रद्द झाल्याचं जाहीर केलं. भारताने मालिका गमावली नसली तरी ट्रॉफीही जिंकलेली नाही. मालिका २-२ बरोबरीत राहिल्यानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?

श्रेयस अय्यर भारताच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

श्रेयस अय्यर म्हणाला, “दुसऱ्या आणि चौथ्या सामन्यात आम्ही चांगली गोलंदाजी केली असती, तर मालिकेचा निकाल वेगळा असू शकला असता. प्रतिस्पर्धी संघाने चांगली फलंदाजी केली आणि त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. फलंदाजीच्या बाबतीत आमची कामगिरी शानदार होती; मात्र गोलंदाजीती रणनितीची अंमलबजावणी करताना आम्ही कमी पडलो. प्रतिस्पर्धी संघाने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. शे होपने अप्रतिम फलंदाजी केली.”

“पराभवानंतर पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याची क्षमता ही आमच्या संघाची जमेची बाजू आहे. मात्र, संपूर्ण मालिकेत आम्हाला सातत्य राखता आलं नाही. त्यामुळे यातून आम्हाला चांगलं शिकायला मिळालं. आजही आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती उत्कृष्ट होती. आता न्यूझीलंडविरुद्धची मालिका आव्हानात्मक असेल,” असं श्रेयस पुढे म्हणाला.

वैभव सूर्यवंशीला मालिकेत एकही संधी न मिळाल्याबाबत श्रेयस काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशीला मालिकेत एकदाही खेळण्याची संधी न मिळाल्याबद्दल श्रेयसने म्हटलं, “वैभव सूर्यवंशीला मी त्याला सतत सांगत असतो की, तुलाही संधी मिळेल. तू तुझ्या प्रक्रियेवर विश्वास ठेव आणि त्यात सातत्य राख. मानसिकता साधारण ठेव आणि संधी मिळत नाही म्हणून फार विचार करू नकोस. कधीकधी संधीची वाट पाहावी लागते. आमच्याकडे दोन उत्कृष्ट सलामीवीर आहेत, ज्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.”

संघाच्या प्रवासाबाबत आणि लांब प्रवासानंतरही संघाच्या चांगल्या कामगिरीबाबत कर्णधार म्हणाला, “सतत प्रवास करण्याची आम्हाला आता सवय झाली आहे. तरीही प्रवासानंतर शरीराला सावरण्यासाठी वेळ मिळणं आणि रोजच्या सरावाचं वेळापत्रक कायम ठेवणं सोपं नसतं. पण आम्ही ते चांगल्या प्रकारे करत आहोत. नव्या परिस्थितीशीही आम्ही लवकर जुळवून घेत आहोत. हे सातत्य असंच कायम राहिलं, तर ते संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.”

वेस्ट इंडिजनंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. २२ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.