Shreyas Iyer Statement on India’s Defeat: नॉटिंगहॅमचे ‘ट्रेंट ब्रिज’ मैदान भारतीय क्रिकेट संघासाठी एक कटू आठवणीसाठी ओळखलं जाईल. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला टी-२० इतिहासातील सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने दिलेल्या २०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ अवघ्या ७६ धावांत गारद झाला. यासह १२५ धावांच्या सर्वात मोठ्या फरकाने भारताने सामना गमावला. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घेऊया.
तिसऱ्या टी-२० सामन्यातील या दारुण पराभवासह, इंग्लंडने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की, भारतीय संघाला सलग पाच सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. या खराब कामगिरीची सुरुवात आयर्लंड दौऱ्यापासून झाली, जिथे भारतीय संघाने दोन्ही सामने गमावले. त्यानंतर, इंग्लंड मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. दुसऱ्या सामन्यात भारताला चार गडी राखून दारुण पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर नॉटिंगहॅममध्येही संघाचा मोठा पराभव झाला.
श्रेयस अय्यर भारताच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने पराभवानंतर संघाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, “आजची आमची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. यापेक्षा योग्य शब्द माझ्याकडे नाही. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत होणं कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. सर्वप्रथम हा पराभव स्वीकारावा लागेल आणि त्यानंतर आमच्या चुका शोधून पुन्हा नव्याने नियोजन करावं लागेल. ही २०० धावा होतील अशी खेळपट्टी नव्हती. पॉवरप्लेमध्ये चार विकेट्स गमावल्यामुळे आमची लयच बिघडली आणि त्याचा फटका संपूर्ण डावाला बसला.”
अय्यर पुढे म्हणाला, “तुम्ही कितीही रणनिती आखल्या तरी मैदानावर उतरल्यावर परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागतं. योग्य लेंग्थवर गोलंदाजी करणं महत्त्वाचं होतं, पण आम्ही त्याची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलो. धावांचा पाठलाग करताना ठरावीक लय आणि पॅटर्न तयार करणं गरजेचं असतं, मात्र आमचं नियोजन प्रत्यक्षात उतरलं नाही.”
यापुढे संघ अधिक दमदार पुनरागमन करेल, असा विश्वास व्यक्त करत तो म्हणाला, “आम्ही अत्यंत खराब क्रिकेट खेळलो, पण या पराभवातून शिकण्यासारखंही खूप काही आहे. प्रत्येक खेळाडूने संघासाठी प्रभावी योगदान कसं देता येईल, याचा विचार करायला हवा. प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारून सामन्यात प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना गुरूवारी ९ जुलैला होणार आहे.
