Shreyas Iyer Explains India Defeat Reasons West Indies 4th T20I: भारतीय संघाला वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या चौथ्या हायस्कोरिंग टी-२० सामन्यात पराभवाचा धक्का बसला. वेस्ट इंडिजने भारताचा २४ धावांनी पराभव करत मालिका आता २-२ अशी बरोबरीत आणली आहे. शे होपचं शतक व किमो पॉलच्या पाच विकेट्सच्या बळावर विडिंज संघाने दणदणीत विजयाची नोंद केली. तर भारतीय संघ मात्र विडिंजसमोर मागे पडला. भारताचा पराभव नेमका का झाला आणि संघाचं काय चुकलं हे कर्णधार श्रेयसने सांगितलं आहे.

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना शे होपचं शतक व टॉप-५ फलंदाजांच्या फटकेबाजीच्या बळावर २४७ धावांचा मोठा डोंगर उभारला. भारताचे गोलंदाज या सामन्यात विशेषत: अपयशी ठरले. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना संजू सॅमसनने संघासाठी वादळी अर्धशतकी खेळी साकारली. पण भारताने एकामागून विकेट्स गमावल्याचा धक्का संघाला बसला. त्यानंतर तिलक वर्मा व नितीश रेड्डीने संघाचा डाव सावरला पण किमो पॉलच्या भेदक गोलंदाजीपुढे टीम इंडिया मागे पडली. किमो पॉलने या सामन्यात ५ विकेट्स घेतल्या.

श्रेयस अय्यरने कोणाच्या डोक्यावर फोडलं भारताच्या पराभवाचं खापर

श्रेयस अय्यर भारताच्या कामगिरीबद्दल आणि संघ धावांचा पाठलाग करताना कुठे कमी पडला, याबाबत सांगताना म्हणाला, “सर्व गोलंदाजीपासून सुरू झालं. मला वाटतं, आम्हाला योग्य टप्प्यावर आणि योग्य दिशेने गोलंदाजी करता आली नाही. अखेर २५० धावांचं लक्ष्य गाठायचं असेल, तर फलंदाजी करताना ठरावीक पद्धतीने पुढे जाणं आवश्यक असतं. धावांचा पाठलाग करताना आमचा दृष्टिकोन मला आवडला, पण गोलंदाज म्हणून आम्हाला आमची रणनिती योग्य प्रकारे अमलात आणता आली नाही. तिथेच आम्ही थोडे कमी पडलो.”

सुरुवातीला अभिषेक शर्मा स्ट्राइकवर नसल्याचा भारताच्या सुरुवातीवर परिणाम झाला का?

‘नाही, तसं नाही. त्या वेळीही आम्ही प्रत्येक षटकात १२ धावांच्या सरासरीने धावा करत होतो. प्रतिस्पर्धी संघाने आपल्या रणनिती योग्य प्रकारे अमलात आणल्या आणि खेळपट्टीवरूनही चेंडूला थोडी जास्त उसळी मिळत होती. चेंडू काहीसा उसळत होता आणि त्यांनी क्षेत्ररक्षणाचाही चांगला वापर केला. त्यामुळे त्यांच्या कामगिरीचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं. त्यांनी आपली रणनीती अगदी अचूकपणे राबवली.”

मधल्या षटकांमध्ये खेळपट्टी संथ झाली आणि चेंडूला अधिक उसळी मिळाली का?

“हो, चेंडू खेळपट्टीवर थोडा थांबून येत होता आणि त्याला अधिक उसळीही मिळत होती. मात्र, गोलंदाजांनी हे ओळखलं आणि त्यानुसार गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणाची मांडणी लक्षात घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ते महत्त्वाचं होतं. विशेषतः मधल्या षटकांमध्ये हे अधिक जाणवलं. काही काळ सामन्याचा वेग आमच्या बाजूने असतानाही प्रतिस्पर्धी संघाने जोरदार पुनरागमन केलं. दबावातून बाहेर पडून पुन्हा प्रभावी कामगिरी करण्याची त्यांची क्षमता कौतुकास्पद होती. मला खात्री आहे की पाचवा सामना रंजक होईल.”

पुढील सामन्यासाठी भारताची रणनीती काय असेल?

“आम्ही धावांचा पाठलाग करताना २२० धावा केल्या आणि त्यानंतर २५० धावांपर्यंत मजल मारली. यावरून प्रत्येक खेळाडूचा दृष्टिकोन आणि त्याची मानसिकता स्पष्ट होते. त्यामुळे पुढील सामन्यातही आमचा दृष्टिकोन असाच राहील. पुढे जाताना आम्हाला गोलंदाजीबाबत फारसा विचार करण्याची गरज नाही, असं मला वाटतं. महत्त्वाचं आहे ते म्हणजे मैदानावर रणनिती योग्य प्रकारे अमलात आणणं आणि प्रत्येक सामन्यात ताज्या मानसिकतेने उतरणं. त्या दिवशी परिस्थिती समजून घेऊन रणनिती अचूकपणे राबवली, तर मिळालेल्या संधीचा फायदा उठवता येतो,” असं अखेरीस कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला.