Shreyas Iyer on India Series Defeat: कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघासाठी इंग्लंडचा दौरा फारच धक्कादायक ठरला आहे. चौथ्या टी-२० सामन्यात, यजमान इंग्लंडने भारताचा नऊ गडी राखून दारुण पराभव केला. या पराभवामुळे, इंग्लंडने ३-० अशी अभेद्य आघाडी घेत पाच सामन्यांची टी-२० मालिका आपल्या नावावर केली आहे. भारतीय क्रिकेटच्या १२ वर्षांच्या इतिहासात टी-२० मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे. पण या पराभवानंतर कर्णधार श्रेयसने केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
पहिल्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ मालिकेत ०-२ असा पिछाडीवर होता आणि चौथ्या सामन्यातील पराभवामुळे यजमान इंग्लंडने आता ३-० अशी विजयी आघाडी मिळवत मालिका आपल्या नावे केली आहे. आता अंतिम सामन्यात प्रतिष्ठेसाठी खेळण्याचं आव्हान भारतीय संघासमोर आहे. श्रेयस अय्यर वगळता संघाचा एकही खेळाडू धावा करू शकला नाही. श्रेयसने ८० धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत भारताचे सर्व गोलंदाज सपशेल फेल ठरले.
श्रेयस भारताच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
भारताच्या पराभवानंतर श्रेयस म्हणाला, “पुन्हा एकदा निराशाच पदरी पडली. १५८ धावा ही या खेळपट्टीवर समाधानकारक धावसंख्या नव्हती. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाने किती सहज आणि वेगाने हे लक्ष्य गाठलं, ते आपण पाहिलंच. आम्ही गोलंदाजीसाठी मैदानात उतरलो तेव्हा मी गोलंदाजांना शक्य तितक्या वेळा योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्यास सांगितलं होतं. मधल्या आणि लेग स्टंपच्या लाईनवर गोलंदाजी केली असती, तर धावा करणं सोपं नव्हतं. मात्र, आम्ही एक्झिक्युशन करण्यात कमी पडलो. तसेच, जेव्हा आम्ही वेगात बदल करण्याचा किंवा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्याकडून काही साधारण चेंडू टाकले गेले आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांनी त्याचा पुरेपूर फायदा घेत धावा केल्या.”
श्रेयस पुढे म्हणाला, “माझ्या वैयक्तिक कामगिरीबद्दल मी नक्कीच समाधानी आहे. मात्र, जर त्या कामगिरीमुळे संघाला विजय मिळाला नाही, तर त्या खेळीचं महत्त्व कमी होतं. त्यामुळे त्या बाबतीत नक्कीच निराशा आहे. कारण मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो, तेव्हा चांगली कामगिरी करून माझ्या संघाला विजय मिळवून देणं हेच माझं ध्येय असतं. दुर्दैवाने आज तसं घडलं नाही. आता पुढील सामन्याकडे लक्ष केंद्रित करून अधिक दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करू.”
“सध्या आमचा संघ ट्रान्झिशनच्या टप्प्यातून जात आहे. त्यामुळे आमच्याकडून अनेक चुका होणारच. संघातील अनेक युवा खेळाडू या कंडीशन्समध्ये प्रथमच खेळत आहेत. त्यामुळे अशा चुका त्यांच्यासाठी शिकण्याची संधी ठरतील. परदेशातील परिस्थितीशी पटकन जुळवून घेणं आणि त्या अनुषंगाने खेळताना आवश्यक ती जागरूकता ठेवणं किती महत्त्वाचं आहे, याची त्यांना निश्चितच जाणीव होईल,” असं श्रेयस अखेरीस म्हणाला. आता भारताचा अखेरचा टी-२० सामना शनिवारी साऊथम्पॅटनमध्ये होणार आहे.
