Shreyas Iyer statement on India Defeat: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने हातातोंडाशी आलेला सामना गमावला. मँचेस्टरमध्ये झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १९० धावांची मजल मारली, परंतु इंग्लंडने एक षटक बाकी असतानाच हे लक्ष्य सहजपणं गाठलं. इंग्लंडच्या या विजयात जेकब बेथेलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली; त्याने आक्रमक फलंदाजी करत नाबाद अर्धशतक झळकावले. रवी बिश्नोईच्या बॅकफूट बो बॉलने सर्वांनाच निराश केलं. भारताच्या विजयानंतर श्रेयस अय्यर नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.

भारताच्या पराभवाला खराब गोलंदाजी कारणीभूत ठरली. विशेषतः लेग-स्पिनर रवी बिश्नोईने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आणि आपल्या चार षटकांत ६० धावा दिल्या. बिश्नोईचं स्पेलमधील अखेरचं षटक भारतासाठी अत्यंत महागडं ठरलं, कारण त्याने या षटकात २९ धावा दिल्या. रवी बिश्नोईने या सामन्यात टाकलेले ३ बॅकफूट नो बॉल चांगलेच महागात पडले. जेबक बेथलने बिश्नोईच्या १७व्या षटकात ३ षटकार लगावत विजय भारताच्या जबड्यातून हिसकावून घेतला.

श्रेयस अय्यर भारताच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?

भारताने हातात असलेला सामना नेमका कुठे गमावला, अशा प्रश्न नासीर हुसैनने विचारताच श्रेयस अय्यर म्हणाला, “सर्वांनाच माहीत आहे सामना नेमका कुठे हातातून निसटला. मात्र, त्यासाठी मी कोणत्याही एका खेळाडूला जबाबदार ठरवू इच्छित नाही. पहिल्या नो-बॉलनंतर तो (रवी बिश्नोई) अधिक दमदार पुनरागमन करेल, अशी मला खात्री होती. पण १७वं षटक आमच्यासाठी निर्णायक ठरलं. तरीही तो या अनुभवातून नक्कीच शिकेल.”

संघाने उभारलेल्या धावसंख्येबाबत श्रेयस म्हणाला, “या खेळपट्टीवर चेंडूला असमान उसळी मिळत होती. त्यामुळे ही धावसंख्या खरोखरच उत्कृष्ट होती. पहिल्या १५ षटकांपर्यंत आम्ही सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवलं होतं. मात्र, त्यानंतर जेकबने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्याचं श्रेय त्यालाच द्यावं लागेल. त्याने मैदानाची परिमाणं आणि खेळपट्टीचं स्वरूप लवकर ओळखलं.”

पुढे श्रेयस म्हणाला, “सॅम करन ऑफस्टंपच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी करत होता आणि ती खरंतर कमाल रणनीती होती. जेकबची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्याची निर्भय वृत्ती. तो सरावातही अशाच आत्मविश्वासाने फलंदाजी करतो. त्याच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. तो दबावाखाली घाबरेल, अशी मला अजिबात अपेक्षा नव्हती.”

“मी नेहमीच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करतो. मला माहीत आहे की, ही कदाचित सर्वात खालची पायरी असेल आणि इथून पुढे फक्त वरच जाता येतं,” असं श्रेयस अखेरीस म्हणाला. इंग्लंडने दुसरा टी-२० सामना जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आता जर भारताला मालिकेत बरोबरी साधायची असेल तर पुढचा सामना संघाला जिंकावा लागणार आहे. भारताचा तिसरा टी-२० सामना ७ जुलैला खेळवला जाईल.