Shreyas Iyer Maiden T20I Century India vs West Indies Lucknow: कर्णधार श्रेयस अय्यरच्या वादळी शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पहिल्या टी-२० सामन्यात ८ विकेट्सने पराभव केला. दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार असून भारताने पहिली टी-२० जिंकत १-० अशी आघाडी मिळवून घेतली. वेस्ट इंडिजने दिलेल्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीसह टीम इंडियाने १४.४ षटकांत १७२ धावा करत दणदणीत विजय मिळवला. यासह श्रेयस अय्यरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचं पहिलं शतक झळकावलं. भारताच्या या कामगिरीनंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला, जाणून घेऊया.
लखनौमध्ये आल्यावर घरच्या मैदानावर आल्यासारखं वाटतं का, यावर श्रेयस अय्यर म्हणाला, “खरं सांगायचं तर, नाही. इतका थकवणारा प्रवास केल्यानंतर मी नेमका कुठे आहे, हेच मला कळत नव्हतं. खरं तर मला वाटतं, आता दररोज अशाच पद्धतीने उठून तयार व्हायला हवं. पण हो, मी खेळपट्टी आणि परिस्थितीशी पटकन जुळवून घेतलं. आम्ही प्रथम गोलंदाजी करणंही आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरलं.”
प्रवासाचा थकवा कसा दूर केला, यावर बोलताना कॅप्टन म्हणाला, “आम्ही त्याकडे कोणतंही कारण किंवा निमित्त म्हणून पाहिलं नाही. इतर कोणताही क्रिकेटपटू जसा खेळायला येतो, तसंच आम्हालाही मैदानात उतरायचं होतं. वनडेमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामने पाहताना किती उत्साहाचं वातावरण होतं, हे आम्ही अनुभवलं. पण टी-२०मध्ये येताना आम्हाला माहिती होतं की, वेस्ट इंडिज हा अतिशय आक्रमक आणि धडाकेबाज संघ आहे. त्यामुळे आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचं होतं ते म्हणजे ठरलेल्या प्रक्रियेवर कायम विश्वास ठेवणं. आज आम्ही तेच केलं. प्रत्येक खेळाडूने दिलेल्या योगदानाचं श्रेय त्याला जातं.”
पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय शतकानंतर श्रेयस अय्यर काय म्हणाला?
“आजच्या माझ्या कामगिरीसाठी मी ‘आनंदातिरेक’ हा शब्द वापरेन. खरंच, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. मी खरंतर माझं पहिलं शतक करण्याचा विचार करत होतो आणि अखेर ते प्रत्यक्षात साकार झालं. त्यामुळे एक गोष्ट नक्की सांगू शकतो, स्वप्नं नक्कीच सत्यात उतरतात.”
विजयानंतर श्रेयस म्हणाला, “विजयाचा आनंदच वेगळा असतो आणि ड्रेसिंग रूममध्ये आम्ही याच गोष्टीवर नेहमी चर्चा करतो. आज तुमचा दिवस असेल, तर संघाला सामना जिंकून देण्याची पूर्ण जबाबदारी तुमची असते. आज माझा दिवस होता. याआधीच्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजांनी सामना संपवला होता. त्यामुळे एकूणच मला वाटतं, ही आमची सर्वसमावेशक कामगिरी होती. याच मानसिकतेने आम्ही पुढे खेळत राहिलो, तर टी-२० क्रिकेटमधील सर्वात आक्रमक संघांपैकी एक होऊ शकतो.”
नमन धीरच्या गोलंदाजीने किती प्रभावित झालास?
“तो खरंच विशेष खेळाडू आहे, असं मी नक्की म्हणेन. अशा निर्णायक क्षणी गोलंदाजी करण्याची मानसिकता आणि पुढाकार दाखवणं खूप महत्त्वाचं असतं. चेंडू टर्न होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्याने त्याचा योग्य फायदा उचलला. त्याची कामगिरी खरंच कौतुकास्पद होती. त्याचा हा दृष्टिकोन मला खूप आवडला.” लांबच्या प्रवासानंतर व विजयानंतर आता खूप झोप घेणार का, यावर कॅप्टन म्हणाला, “झोपेचीच वाट पाहतोय. मला आत्तापासूनच झोप येत आहे. अक्षरचे डोळेही लाल झालेले मला दिसत आहेत. त्यामुळे आम्हा सगळ्यांचीच अवस्था अशीच असेल, याची खात्री आहे.”
