Shreyas Iyer Statement on Punjab Kings first defeat of IPL 2026: राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सला ६ विकेट्सने पराभूत केलं. पंजाब किंग्सचा यंदाच्या स्पर्धेतील हा पहिला पराभव ठरला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २२२ धावांचा डोंगर उभारला होता. तर प्रत्युत्तरात अखेरच्या षटकांमध्ये शुभम दुबे आणि डोनावर फरेरा यांनी राजस्थानला विजय मिळवून दिला. पंजाब किंग्सने विश्वविक्रमी रनचेस केल्यानंतर आता या सामन्यातील पराभवाचं खापर श्रेयस अय्यरने कोणाच्या डोक्यावर फोडलं, जाणून घेऊया.
पंजाब किंग्सच्या गोलंदाजीसमोर राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी १९.२ षटकांत २२२ धावांचं लक्ष्य सहज गाठलं. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. संघाच्या या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला जाणून घेऊया.
श्रेयस अय्यरचं पंजाब किंग्सच्या पराभवानंतर मोठं वक्तव्य
सामन्यात नेमकी कुठे चूक झाली, या प्रश्नाचं उत्तर देताना कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, “माझ्या मते २२४ धावांचा स्कोअर खूपच उत्कृष्ट होता. फलंदाजांनी ज्या पद्धतीने खेळ केला आणि गोलंदाजांवर दबाव टाकला, त्यांना श्रेय द्यायलाच हवं. विशेषतः ही खेळपट्टी थोडी स्लो आणि चिकट होती, अशा परिस्थितीत ही कामगिरी खूपच खास होती. पण आमच्या गोलंदाजीत, विशेषतः अंमलबजावणीत (execution) आम्ही थोडे कमी पडलो. आमची योजना होती की जास्तीत जास्त स्लोअर चेंडू, वेग कमी करून आणि यॉर्कर्स टाकायचे. पण त्या बाबतीत आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलो नाही. त्याचबरोबर मधल्या षटकांत त्यांची भागीदारी खूप महत्त्वाची ठरली. विशेषतः फरेरा आणि शुभम दुबे यांनी शेवटी येऊन केलेल्या धावांमुळे सामना त्यांच्याकडे झुकला.”
या हंगामात संघर्ष करणाऱ्या एकंदरीत गोलंदाजीबद्दल अय्यर म्हणाला, “पाहा, हा असा फॉरमॅट आहे जिथे अनेक खेळाडूंनी आपला खेळ बदलला आहे. ते येताच पहिल्या चेंडूपासून आक्रमण करतात. त्यामुळे गोलंदाजांसाठी ठराविक योजना आखून त्याची अंमलबजावणी करणं खूप कठीण होतं. पण शेवटी सगळं काही execution वरच अवलंबून असतं. तुमच्याकडे योजना असली आणि ती नीट अंमलात आणली, तर तुम्ही जिंकू शकता. आज मात्र तसं घडलं नाही.”
श्रेयस अय्यर पंजाबच्या पहिल्या पराभवानंतर काय म्हणाला?
पुन्हा विजयीपथावर कसं परतणार यावर श्रेयस म्हणाला, “मला वाटतं की आम्ही जे करत आलो आहोत, त्या गोष्टींवर, आपल्या रुटीन आणि प्रोसेसवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एक सामना खेळल्यानंतर लगेच प्रवास करून दुसरा सामना खेळावा लागला, त्यामुळे शरीर थोडं थकलं होतं, पण ते कारण ठरू शकत नाही. आता आमच्याकडे काही दिवस आहेत स्वतःला फ्रेश करण्यासाठी, पुन्हा एकदा नियोजन करण्यासाठी आणि अधिक ताकदीने पुनरागमन करण्यासाठी.”
या पराभवातून काय शिकायला मिळालं, यावर श्रेयसने सांगितलं, “हा या हंगामातील पहिलाच पराभव आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही याआधी २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला आहे आणि तितक्याच धावांचा बचावही केला आहे. त्यामुळे हा फक्त असा एक सामना होता जिथे गोष्टी आपल्या बाजूने गेल्या नाहीत. आता तो मागे ठेवून पुढे जाणं गरजेचं आहे. मागे वळून पाहिलं तर बऱ्याच गोष्टी वेगळ्या घडू शकल्या असत्या, पण पुढे जाताना सकारात्मक आणि आशावादी राहणं महत्त्वाचं आहे.”
