Shreyas Iyer Statement on Punjab Kings Defeat: पंजाब किंग्सला आयपीएलमध्ये सलग सहा सामने जिंकल्यानंतर आता सलग चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. प्लेऑफची शर्यत तोंडावर असताना पंजाबला हे सलग चार पराभव चांगलेच महागात पडणार आहेत. दिल्लीने पंजाब किंग्सचा ३ विकेट्सने पराभव करत स्वत:ला प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवलं आहे. संघाच्या सलग चौथ्या पराभवानंतर श्रेयस अय्यर चांगलाच संतापलेला दिसला. त्याने पराभवाचं खापर कोणावर फोडलं, जाणून घेऊया.
दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत पंजाबला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पंजाब किंग्सने प्रियांश आर्य व प्रभसिमरन सिंह यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. प्रियांश आर्य ५६ धावा करत बाद झाला तर कर्णधार श्रेयस अय्यरने ५९ धावा करत अर्धशतकी खेळी केली. याशिवाय कुपर कॉनोलीने ३८ धावा तर सूर्यांश शेडगेने ८ चेंडूत २१ धावा करत संघाला २१० धावांपर्यंत नेलं. पण गोलंदाजीत संघ मात्र अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.
पंजाबने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाची सुरूवात खराब झाल्यानंतर कर्णधार अक्षर पटेल व डेव्हिड मिलर यांनी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. तर अखेरच्या षटकांमध्ये आशुतोष शर्मा, माधव तिवारी व आकिब नबी दार यांनी संघाला विजय मिळवून दिला.
श्रेयस अय्यरचं पंजाब किंग्सच्या पराभवानंतर मोठं वक्तव्य
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर संघाच्या पराभवानंतर चांगलाच संतापला होता. श्रेयस म्हणाला, “मी उगीच आढेवेढे न घेता थेट मुद्द्यावर येतो. पुन्हा एकदा आमचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे झाली. या खेळपट्टीवर नक्कीच २१० धावा किमान ३० धावांनी जास्त होत्या असं मला वाटतं, कारण चेंडू सीम होत होता आणि उसळीही अनियमित होती.”
युझवेंद्र चहलला गोलंदाजी का दिली नाही, याबद्दल बोलातान कर्णधार म्हणाला, “माझ्या मनात चहलला गोलंदाजी देण्याचा विचार नक्कीच आला होता. पण ज्या पद्धतीने चेंडू सीम होत होता आणि वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती, त्यानुसार आम्ही योग्य लाइन आणि लेंथ कायम ठेवली असती तर विकेट्स मिळवू शकलो असतो. दुर्दैवाने तसं पुन्हा घडलं नाही.”
या विकेटवर कशी गोलंदाजी करायला हवी होती? यावर श्रेयस म्हणाला, “चेंडू सतत पिचवर योग्य ठिकाणी टाकणं गरजेचं होतं. मी नेहमी सांगतो की ‘हार्ड लेंथ’ किंवा त्यापेक्षा थोडी छोटी लेंथ ही सर्वोत्तम असते, विशेषतः नवीन फलंदाज मैदानात आल्यावर. अशा चेंडूंवर मोठे फटके मारणं सोपं नसतं. सतत त्याच भागात गोलंदाजी केली तर एखादा चुकीचा फटका नक्की मिळतो आणि विकेटची संधी निर्माण होते. मात्र, आमचं नियोजनच कमी पडलं.”
