Shreyas Iyer on Vaibhav Sooryavanhi Debut: श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ १ जुलैपासून इंग्लंडविरूद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या या मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे. आयर्लंडविरूद्ध टी-२० मालिका गमावल्यानंतर संघ या मालिकेत कशी सुधारणा करणार हेही पाहण्यासारखं असेल. याचबरोबर १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला भारताकडून या मालिकेत पदार्पणाची संधी मिळणार का, यावरही सर्वांचं लक्ष आहे. वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाविषयी प्रश्नाचं उत्तर देताना श्रेयस अय्यरने विचित्र उत्तर दिलं आहे. श्रेयस अय्यरचं हे उत्तर ऐकून सोशल मीडियावर चाहते त्याला ट्रोल करत आहेत.
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षभरात सर्वांचं आपल्या फलंदाजीने लक्ष वेधलं आहे. वैभव सूर्यवंशीने अंडर-१९ विश्वचषकात भारताला विश्वचषक जिंकून देण्यात फायनलमध्ये मोठी भूमिका बजावली होती. यानंतर आयपीएल २०२६ मध्ये तर वैभव सूर्यवंशीने धुमाकूळ घातला. त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपदेखील मिळवली. या त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर त्याची भारताच्या अ संघात आणि लागोपाठ भारताच्या वरिष्ठ संघात निवड झाली. आयर्लंडमध्ये वैभवला पदार्पणाची संधी मिळेल अशी शक्यता होती. पण त्याला अजूनही डेब्यू देण्यात आलेला नाही.
वैभव सूर्यवंशीबाबत प्रश्न विचारताच श्रेयस अय्यरचं उत्तर
वैभव सूर्यवंशीला भरपूर धावा करूनही अद्याप प्लेईंग इलेव्हनला संधी का मिळालेली नाही, असा प्रश्न श्रेयस अय्यरला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “सध्या संघात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे, असं नाहीये की फक्त एकाच खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला संघातील प्रत्येक खेळाडूला संधी द्यायची आहे आणि त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण करायची आहे. जेणेकरून पुढे मालिकेत प्रत्येक खेळाडूमध्ये खेळण्याचा आत्मविश्वास असेल.”
श्रेयस अय्यरने यावेळी यंदाच्या टी-२० विश्वचषक विजेतेपदात मोलाचा वाटा उचललेल्या खेळाडूंवर संघ व्यवस्थापनाचा कायम विश्वास असल्याचंही स्पष्ट केलं. “ज्या खेळाडूंनी आम्हाला मागील टी-२० विश्वचषक जिंकून दिला, त्यांच्यावर आमचा नक्कीच विश्वास आहे. टी-२० क्रिकेट कसं खेळायचं आणि त्या प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी कशी करायची, याची त्या खेळाडूंना स्पष्ट कल्पना आहे. त्यामुळे संघाचा मजबूत गाभा आमच्याकडे तयार आहे त्यामुळे त्यांनादेखील पाठिंबा देणं गरजेचं आहे,” असं अय्यर म्हणाला.
दरम्यान, आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत वैभव सूर्यवंशीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने निवड समिती आणि संघ व्यवस्थापनावर त्याला भारताकडून पदार्पणाची संधी देण्याचा दबाव वाढत आहे.
