Shreyas Iyer Stunning Catch Shocks Rohit-Surya Video: मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स सामन्यात श्रेयस अय्यरच्या उत्कृष्ट झेलने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. श्रेयस अय्यरने बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करताना हवेत उंच उडी घेत एका हाताने टिपलेल्या कॅचने सर्वच जण अवाक् झाले आहेत. डगआऊटमध्ये बसलेले रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांचे चेहरेदेखील आश्चर्याचा धक्का बसल्याने पाहण्यासारखे झाले होते. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकत मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्माच्या रूपात मुंबईला मोठा धक्का बसला असून रोहित या सामन्यात खेळताना दिसणार नाही. मुंबईची सुरूवात पुन्हा एकदा खराब झाली. दुसऱ्याच षटकात सलग दोन चेंडूंत रायन रिकल्टन व सूर्यकुमार यादव यांनी विकेट्स गमावल्या. यानंतर नमन धीर व क्विंटन डीकॉक यांनी शतकी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला होता.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत क्विंटन डीकॉकला खेळण्याची संधी मिळाली आणि यंदाच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावलं आहे. नमन धीर अर्धशतकी खेळी करत बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या फलंदाजीला आला. हार्दिक पंड्याने १४ धावांच्या खेळीदरम्यान फक्त १ षटकार लगावला. मार्काे यान्सनच्या १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिकने षटकार खेचला.

हार्दिक १८व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अजून एक मोठा फटका खेळायला गेला. चेंडू पाहताच अय्यर त्याच्या डावीकडून लॉन्ग ऑनच्या दिशेने धावत गेला आणि षटकारासाठी जाणारा चेंडू हवेत उंच उडी मारून टिपला. श्रेयसचं शरीर बाऊंड्री लाईनच्या वर हवेत बाहेर होतं. श्रेयस बाऊंड्री लाईनबाहेर पडणार हे स्पष्ट दिसत होतं, तितक्यात त्याने बाहेर उभ्या असलेल्या झेवियर बार्टलेटच्या दिशेने चेंडू फेकला आणि त्याने तो टिपला.

श्रेयस अय्यरच्या सुपरमॅन कॅचवर रोहित-सूर्याची प्रतिक्रिया होतेय व्हायरल

श्रेयस अय्यरने अगदी सुपरमॅनप्रमाणे हवेत ज्याप्रकारे झेप घेतली हे पाहून मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमधील सर्वच जण चकित झाले. पण रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना तर श्रेयस अय्यरचा झेल पाहून जणू आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा तर तोंडावर हात ठेवून आश्चर्य व्यक्त करताना दिसला. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या या प्रतिक्रियेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

श्रेयस अय्यरला त्याने झेल टिपण्यासाठी केलेल्या प्रयत्नावर इतका विश्वास होता की त्याने बार्टलेटने चेंडू टिपल्यानंतर थेट सेलिब्रेट केलं. वानखेडेमधील प्रेक्षकांकडे पाहत सेलिब्रेशनचा आवाज येत नाहीये असं सेलिब्रेशन केलं आहे. यासह मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला जिंकण्यासाठी १९६ धावांचं आव्हान दिलं आहे.