भारतीय टी२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरची आयसीसीच्या टी२० क्रमवारीत घसरण झाली आहे. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा अव्वल १० मध्ये स्थान पटकावलं आहे. भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धची मालिका जिंकली पण श्रेयस अय्यरला मोठी खेळी करण्याची संधीच मिळाली नाही. सलामीच्या लढतीत त्याने ५ चेंडूत ८ धावा केल्या. दुसऱ्या लढतीत त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या. यामुळे क्रमवारीत सहा स्थानांनी घसरण होऊन तो २९व्या स्थानी स्थिरावला आहे.
धडाकेबाज सलामीवीरांची जोडी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार कामगिरी करत क्रमवारीत आगेकूच केली आहे. अभिषेकने २ सामन्यात १२१ धावा केल्या आहेत. ६०च्या सरासरीने त्याने २३७च्या स्ट्राईकरेटने धावा केल्या आहेत. अभिषेकने क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पॉकेट डायनॅमो नावाने प्रसिद्ध इशान किशन अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या टी२० सामन्यात तडफदार खेळी करत संजूने अव्वल ३० मध्ये प्रवेश केला आहे.
बंगळुरूतल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इथे रिहॅब प्रक्रिया पूर्ण करत बुमराहने पुनरागमन केलं. बुमराहने सात स्थानांनी वाटचाल करत १०वं स्थान पटकावलं आहे. अर्शदीप सिंगने ११ स्थानांनी प्रगती करत १४वे स्थान गाठले आहे. अर्शदीपने २ सामन्यात ५ विकेट्स पटकावल्या आहेत. वरुण चक्रवर्ती पहिलाच सामना खेळू शकला आहे. वरुण ५व्या स्थानी आहे तर अक्षर पटेल २७व्या स्थानी आहे.
टीम इंडियाचे अष्टपैलू हार्दिक पंड्या, शिवम दुबे यांची क्रमवारीत घसरण झाली आहे. पंड्या दुखापतीतून सावरत असल्याने तो अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल पाचच्या बाहेर गेला आहे. शिवम दुबेची १३ वरून १६व्या स्थानी घसरण झाली आहे.
