Shreyas Iyer wicket female fan crying Indore T20I: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या चाहतीने सर्वांचं लक्ष वेधलं. भारताचा कर्णधार बाद होताच एक महिला चाहती स्टेडियममध्येच रडू लागली होती. तिचा हा भावूक आणि डोळ्यांत पाणी असलेला क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला. या सामन्यात भारताने १२ धावांनी विजय मिळवला असला, तरी कर्णधार श्रेयस अय्यर मात्र केवळ एक धाव काढून बाद झाला.
भारतीय संघाचे चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी अनेकदा प्रार्थना करताना, त्यांना चिअर करताना दिसतात. अशीच एक चाहती इंदूरमध्ये भारताचा सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. स्टँडसमध्ये बसलेल्या एका तरुणीला आपला आवडता क्रिकेटपटू लवकर बाद झाल्याचं पाहून ती निराश झाली आणि तिच्या गालावरून अश्रू ओघळू लागले.
नवव्या षटकात इशान किशन बाद झाल्यानंतर जेव्हा अय्यर फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा इंदूरच्या प्रेक्षकांना त्याच्या बॅटमधून आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळेल अशी पूर्ण अपेक्षा होती; मात्र, पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर, रोस्टन चेसच्या पुढच्याच चेंडूवर श्रेयस अय्यर पायचीत होत बाद झाला. श्रेयस बाद होताच कॅमेरा चाहत्यांकडे वळताच एक चाहती निराश होत आपले डोळे पुसताना दिसली. या मुलीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात वादळी शतक करत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक जिंकल्यानंतर टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभारली. अल्झारी जोसेफने दुसऱ्याच षटकात संजू सॅमसनला (०३) पूरनकरवी झेलबाद केलं. त्यानंतर, अवघ्या १८ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेक शर्माने इशान किशनच्या साथीने ‘पॉवरप्ले’मध्ये संघाची धावसंख्या एक बाद ८७ पर्यंत नेली.
आठव्या षटकापर्यंत धावसंख्येने १०० धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, नवव्या षटकात भारताला एकापाठोपाठ दोन धक्के बसले: दुसऱ्या चेंडूवर इशान किशन स्टंपिंग होत बाद झाला आणि दोन चेंडूंनंतर श्रेयस अय्यर पायचीत होत बाद झाला. त्यानंतरच्याच षटकात अभिषेकदेखील बाद झाला, ज्यामुळे भारताची धावसंख्या १ बाद ११५ वरून ४ बाद १२४ अशी झाली. तरी भारताच्या इतर फलंदाजांनी बाजी मारत २२३ धावांचा आकडा गाठला.
भारताने दिलेल्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, शिमरॉन हेटमायर आणि कामिल पूरन यांच्या उत्कृष्ट खेळींनंतरही वेस्ट इंडिजचा संघ ७ बाद २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटी शमार स्प्रिंगरने आक्रमक फलंदाजी केली, परंतु त्याला संघाला विजयापर्यंत नेता आलं नाही. भारताकडून अर्शदीपने ४४ धावांत तीन बळी घेतले, तर नमन धीरने ३९ धावांत दोन गडी बाद केले.
